मुंबईतील शाळाही ४ ऑक्टोबरपासून सुरू

शाळा सुरू करण्यासाठी इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग असलेल्या शाळांमधील कोरोना लसीकरण केंद्र व कोरोना विलगीकरण कक्ष सहाय्यक आयुक्तांच्या सहाय्याने अन्य ठिकाणी स्थलांतरित करून वापरण्या योग्य सुस्थितीत करावे.

  मुंबई: मुंबई महापालिका आयुक्तांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करत शहरातील सर्व शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास बुधवारी परवानगी दिली. त्यामुळे आता मुंबईतही ४ ऑक्टोबरला शाळेची घंटा वाजणार आहे. मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती बंधनकारक असणार आहे. मुंबईमध्ये ऑफलाईन शाळा सुरू होणार असली तरी शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाची सुविधा कायम ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळले जाणार आहे.

  राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते ८ वी आणि शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच जाहीर केला. मात्र मुंबईतील शाळांसंदर्भातील निर्णय पालिका घेणार होती. त्यानुसार बुधवारी पालिका आयुक्तांनी शहरातील सर्व माध्यमांच्या इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र शाळा सुरू करताना राज्य सरकारच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे सर्व शाळांना बंधनकारक असणार आहे.

  ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यापूर्वी शाळा प्रशासनाने आवश्यकतेनुसार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना उपस्थित ठेवावे. शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शनाचे शाळांना अचूक पालन करायचे आहे. पालिका क्षेत्रातील मनपा शाळांचे सहाय्यक आयुक्त यांच्या सहाय्याने सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशनने निर्जतुंकीकरण करून घ्यावे तर अन्य व्यवस्थापनांच्या शाळांनी आपल्या स्तरावर वर्गांचे निर्जतुंकीकरण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. मुंबईतील शाळा ४ ऑक्टोबरपासून ऑफलाईन सुरू होणार असल्यातरी ज्या विद्यार्थ्यांना शाळेत येणे शक्य होणार नाही, अशा विद्यार्थ्यांंसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.

  शिक्षकांना अन्य कामातून कार्यमुक्त करणार कोरोना काळामध्ये अनेक शिक्षकांना कोरोना ड्युटी लावण्यात आली आहे. यामध्ये शिक्षकांना कोव्हिड सेंटर, रेल्वे स्थानकांवर कोव्हिड लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी करण्याची जबाबदारी सोपवली आहे. तसेच निवडणूक विषयक कामासाठी शिक्षकांची नेमणूक केली आहे. त्यामुळे या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

  शाळेतील केंद्र इतरत्र हलवणार
  कोरोना काळात नागरिकांना विलगीकरणाची सुविधा उपलब्ध व्हावी आणि त्यांचे लसीकरण व्हावे यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये लसीकरण व विलगीकरण कक्ष उभारण्यात आले होते. मात्र शाळा सुरू करण्यासाठी इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग असलेल्या शाळांमधील कोरोना लसीकरण केंद्र व कोरोना विलगीकरण कक्ष सहाय्यक आयुक्तांच्या सहाय्याने अन्य ठिकाणी स्थलांतरित करून वापरण्यायोग्य सुस्थितीत करावे. पालिकेच्या शाळा व अन्य व्यवस्थापनाच्या शाळांनी आपले वर्ग नजीकच्या महापालिका किंवा खासगी आरोग्य केंद्राशी संलग्न करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.