…म्हणून महापालिका क्षेत्रातील शाळा १५ जानेवारीपर्यंत बंदच राहणार

मुंबई : मुंबई पािलका क्षेत्रात कोरोनाचा प्रार्दुभाव नियंत्रणात असला तरीही अन्य देशांत कोरोनाची आलेली दुसरी लाट अन्य राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता मुंबई पालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या , सर्व शाळा व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांकडून देण्यात आले आहेत.

यासंबंधी मुंबई पािलका शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहेत. १५ जानेवारीनंतर शाळा सुरु होणार की नाही यासंदर्भातील निर्णय येत्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल अशी माहिती पालिका शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी दिली.

दरम्यान, १८ जानेवारीपासून वाणिज्य दूतावासाच्या शाळा (अमेरिकन अँड अदर काउन्स्लेट स्कुल )सुरु करण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र या शाळांना कोव्हीड १९ च्या खबरदारीचे व आरोग्य , स्वच्छता, इतर सुरक्षाविषयक नियम यांचे काटेकोरपणे पालन करूनच शाळा सुरु करता येतील अशी माहिती ही पालकर यांनी दिली. यापूर्वीही राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे मुंबईमध्ये २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरु करण्याची तयारी सुरु करण्यात आली होती.

शिक्षण विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनावर शाळा सुरु करण्याचा निर्णय सोपविल्यामुळे मुंबई पालिका प्रशासनाने ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता नवीन वर्षातही आणखी १५ दिवस शाळा व शैक्षणिक संस्था बंदच राहणार असून ऑनलाईन शिक्षण पूर्वीप्रमाणे सुरु राहणार आहे.

दरम्यान, ठाणे जिल्हा परिषदेकडून सर्व शाळांच्या मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राचार्यांना शाळा व शैक्षणिक संस्थांना पूर्वतयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईत ही शाळा सुरु करण्यासाठी चाचपणी सुरु असून लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.