वरिष्ठ साहित्यिक, कलावंतांना आठ दिवसात मिळणार मार्च अखेरपर्यंतचे मानधन

जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचे मानधन अदा करण्यात येत आहे. यासाठी १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून वारसदार व नव्याने अंतर्भूत झालेल्या काही कलाकारांनाही मानधन अदा होईल.

    नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, मुंबई.

    राज्यातील वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन योजनेतील सुमारे २८ हजार पात्र मानधनधारकांच्या खात्यात येत्या आठ दिवसांत मार्च अखेरपर्यंतचे मानधन जमा होईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले.

    जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचे मानधन अदा करण्यात येत आहे. यासाठी १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून वारसदार व नव्याने अंतर्भूत झालेल्या काही कलाकारांनाही मानधन अदा होईल.

    कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कलाकारांच्या पाठीशी सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील वरिष्ठ साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी राज्य शासनाकडून ही योजना सन १९५५ पासून राबवण्यात येत असून मानधनात नुकतीच वाढ करण्यात आली आहे.