rajesh tope

राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. पवार यांना पित्ताशय नलिकेत खडे आढळल्यानंतर पोटदुखीचा त्रास होत होता. मात्र, एन्डोस्कोपीद्वारे हे खडे काढण्यात आले आहेत. आता त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना आराम वाटत आहे. त्यांचा पोटदुखीचा त्रासही थांबला असल्याचे टोपे म्हणाले.

    मुंबई :  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर येत्या ८-१० दिवसात आणखी एक शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.शरद पवार यांच्यावर काल रात्री उशीरा शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती उत्तम आहे, अशी माहितीही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. पवार यांना पित्ताशय नलिकेत खडे आढळल्यानंतर पोटदुखीचा त्रास होत होता. मात्र, एन्डोस्कोपीद्वारे हे खडे काढण्यात आले आहेत. आता त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना आराम वाटत आहे. त्यांचा पोटदुखीचा त्रासही थांबला असल्याचे टोपे म्हणाले.

    लवकरच आणखी शस्त्रक्रिया

    टोपे म्हणाले की, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लवकरच पवारांचा गॉल ब्लॅडर काढण्यात येणार आहे. गॉल ब्लॅडर काढल्याने त्यांच्या दैनंदिन कार्यप्रणालीवर काहीही परिणाम होणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोटदुखीचा त्रास वारंवार होऊ नये म्हणून डॉक्टरांनी हा निर्णय घेतला.  लवकरच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून गॉल ब्लॅडर काढण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मात्र, त्यांची प्रकृती आणखी उत्तम वाटली तर लगेच चार-पाच दिवसातही त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल, असे ते म्हणाले.

    दिग्गजांकडून विचारपूस

    पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर सकाळी माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्नी नीलम आणि पुत्र आमदार नितेश राणे यांच्यासह पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात भेट घेतली. राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनीही पवारांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी पवारांनी या नेत्यांशी दहा मिनिटे चर्चा केली. पित्ताशयाचा त्रास जाणवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बहुतांश दिग्गजांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.