कांदिवलीतील शताब्दी रुग्णालय आता लवकरच सुपर स्पेशालिस्ट

    मुंबई : मुंबई महापालिकेचे कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालय आता लवकरच ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ होणार आहे. या रुग्णालयात कार्डिओलॉजी, न्युरोलॉजी, सिटीस्कॅन आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत तर हॉस्पिटलसाठी दहा मजली स्वतंत्र आणि प्रशस्त इमारत देखील बांधण्यात येणार असून, या इमारतीत ३२५ खाटांची व्यवस्था असेल. निवासी वसतीगृहाचे बांधकामही केले जाणार आहे. या कामासाठी महापालिकेने निविदा काढल्या आहेत. बांधकामासाठी ३०१ कोटी ८ लाख ५५ हजार रुपये एकूण खर्च पालिका करणार आहे.

    दरम्यान पश्चिम उपनगरातील हजारो नागरिकांसाठी या रुग्णालयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या या रुग्णालयात ४४५ खाटांची व्यवस्था आहे. दररोज शेकडोंच्या संख्येने येथे उपचारासाठी रुग्ण येत असतात. कोविड काळात शताब्दी रुणालय पश्चिम उपनगर आणि उत्तर मुंबईसाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. या रुग्णालयाच्या आधुनिकीकरणासाठी ९ महिन्यांपूर्वी राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाची परवानगी मिळाली आहे. इतर आवश्यक बाबींचीही पूर्तता झाल्याने आता रुग्णालयाच्या बांधकामासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे लवकरच सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार आहे. त्यामुळं उपनगरातील नागरिकांसाठी हे रुग्णालय अधिक सोयीस्कर ठरणार आहे.

    आगामी काळात या रुग्णालयात डॉक्टर, नर्स, कर्मचारी आदींसाठी २२ मजली हॉस्टेलची सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, या प्रस्तावित रुग्णालयात रेडिओथेरपी डे केअर, अँडोस्कॉपी, हेमॅकोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, युरोलॉजी, क्रोनिक डायलिसिस सेंटर, कॅथलॅब, एमआरआय, सीटीस्कॅन, एक्स-रे आदी सुविधा रुग्णांना मिळणार आहेत. त्यामुळं पश्चिम उपनगरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच या रुग्णालयामुळं रुग्णांसाठी आणखी एक अत्याधुनिक रुग्णालय रुग्णांच्या सेवेत दाखल झाल्यामुळं नागरिकांना दिलासा मिळाला आहे.