ED team arrives at Shiv Sena MLA Pratap Saranaik's house,

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्या निवासस्थानी छापेमारी कारवाई केल्यानंतर त्यांना तीनदा चौकशीसाठी बोलाविले आहे. आता पुन्हा एकदा त्यांना समन्स बजाविण्यात आले असून गुरुवारी हजर राहण्याची सूचना सरनाईक यांन ईडीकडून करण्यात आली आहे. ईडीला टॉप सिक्युरिटी ग्रुप आणि प्रताप सरनाईक यांच्यातील काही संशयास्पद व्यवहाराबाबतचे पुरावे मिळाले असल्याची चर्चा आहे.

चांदोलेच्या कोठडीसाठी हायकोर्टात धाव

ईडी चौकशीदरम्यान आपली बाजू भक्कम पणे मांडण्यासाठी आपल्याला चौदा दिवसांचा वेळ द्यावा, अशी मागणी प्रताप सरनाईक यांच्या लीगल टीमकडून करण्यात आली होती. मात्र, यावर कुठलीही वेळ वाढवून देण्यास स्पष्टपणे नकार देत तिसऱ्यांदा प्रताप सरनाईक यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. येत्या गुरुवारी प्रताप सरनाईक यांना ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे. दरम्यान, मनी लॉन्ड्रिंगसंदर्भात तपास करत असलेल्या ईडीकडून टॉप सिक्युरिटीचा मालक अमित चांदोले यास अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या वाढीव ईडी कस्टडीसाठी विशेष न्यायालयमध्ये मागणी करण्यात आली. मात्र, विशेष न्यायालयाने अमित चांदोलेची कोठडी ईडीला देण्यास नकार दिल्यामुळे विशेष न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात ईडीकडून उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली आहे.

भक्कम पुरावे व साक्षीदार असल्याचा दावा

या याचिकेत ईडीने म्हटले आहे, की ईडीकडे मनी लॉंड्रिंगसंदर्भात अमित चांदोले व प्रताप सरनाईक यांच्यादरम्यान झालेल्या व्यवहारासंबंधी पुरावे व साक्षीदार असूनसुद्धा विशेष न्यायालयाकडून आरोपीची कोठडी देण्यात आलेली नाही. ईडी कस्टडीत प्रताप सरनाईक यांचा या प्रकरणातील सहभाग उघड होईल, असा ईडीने दावा केला आहे.

सरनाईकांचे नाव घेण्यासाठी दबाव

दरम्यान, अमित चांदोले याने मुंबई उच्च न्यायालयमध्ये ईडीच्या विरोधात आरोप केला आहे. प्रताप सरनाईक यांचे नाव घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे. ईडी कोठडीत माझ्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप अमित चांदोलेने केला. मात्र, ईडीने अमित चांदोलेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या संबंधातला निर्णय राखून ठेवलेला आहे.