‘भाजपवाल्यांनो, बंगळुरूचे राजभवन गाठून आता बोम्मईंचे सरकार घालवाच!’ शिवसेनेचं आव्हान

एरवी महाराष्ट्रात असे काही घडले की, राजभवनावर त्यांचे ‘जथेच्या जथे’ पोहोचतात व सरकार बरखास्तीची मागणी करतात. कर्नाटकातील घटनेनंतर हे का होऊ नये? फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शे-पाचशे जणांच्या भाजप शिवप्रेमींनी बंगळुरूत तळ ठोकूनच बसले पाहिजे व राजभवनात वारंवार जाऊन बोम्मई सरकार बरखास्तीची मागणी करत राहिले पाहिजे. तरच ते जातिवंत शिवप्रेमी, पण कर्नाटकात वेगळे व महाराष्ट्रात जगावेगळे अशी भाजपवाल्यांची एकंदरीत तऱ्हा दिसते.

  कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या विचारांचा अपमान करण्याच्या घटना वारंवार घडतात व दुसऱ्या बाजूला पंतप्रधान मोदी हे काशीत जाऊन छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा गौरव करतात. कर्नाटकात वेगळे व महाराष्ट्रात जगावेगळे अशी भाजपवाल्यांची एकंदरीत तऱ्हा दिसते. पंतप्रधानांनी काशीस मांडलेला विचार चार दिवसांनीही बंगळुरूत पोहोचला नाही. भाजपवाल्यांनो, बंगळुरूचे राजभवन गाठा, बोम्मईंचे सरकार आता घालवाच! असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपला खुलं आव्हान देण्यात आलं आहे.

  काय म्हटलंय सामनात?

  छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची कर्नाटकची ही पहिलीच घटना नाही. बंगळुरूत शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची विटंबना झाल्याची बातमी वणव्यासारखी पसरली. महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत त्या घटनेचे पडसाद उमटले. कर्नाटकातील शिवरायांच्या विटंबनेची घटना ही छोटी घटना असल्याचे वक्तव्य करून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रयत्न केला. शिवरायांचा अपमान ही किरकोळ किंवा छोटी घटना असेल तर मोठे काय? असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो.

  ‘हिंदूंच्या अखिल भारतीय आधुनिक इतिहासातील युगप्रवर्तक राष्ट्रपुरुष’ असे मूल्यमापन जदुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराजांचे केले आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवराय हे गेली चार शतके कायमचे ‘पुण्यश्लोक अभिमान बिंदू’ म्हणून स्थिर आहेत. आठेक दिवसांपूर्वी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रायगडावर गेले व छत्रपतींना अभिवादन करून दिल्लीस परतले. चारेक दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी काशीत जाऊन विश्वनाथ मंदिर परिसरातील विकासकार्याचे उद्घाटन केले. त्या सोहळय़ात मोदी यांनी शिवरायांच्या शौर्याचा मुक्तकंठाने गौरव केला. मोगलांनी काशीसह अनेक प्रांतांतील मंदिरांचा विध्वंस केला, तेव्हा शिवरायांची भवानी तलवार संरक्षणासाठी तळपत होती, असे पंतप्रधान म्हणाले.

  शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानच्या सीमा आपल्या घरापर्यंत पोहोचल्या असत्या असे एकदा यशवंतराव चव्हाण म्हणाले होते. अशा शिवाजी महाराजांची विटंबना भाजपशासित राज्यात होते व मुख्यमंत्री बोम्मई यांना ती किरकोळ घटना वाटते हासुद्धा महाराजांचा अपमानच आहे.

  पुतळ्य़ांची विटंबना करून राष्ट्रपुरुषांचा अपमान करणे, त्यातून वातावरण खराब करणे ही एक विकृती समाजात वाढत चालली आहे. छत्रपती शिवरायांच्या विटंबनेचे वृत्त ताजे असतानाच त्याच रात्री बंगळुरूत क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्य़ाचीही विटंबना झाल्याचे समोर आले आहे. राणी चेन्नम्माच्या पुतळय़ाची विटंबना होण्याचे प्रकार घडले आहेत व मुख्यमंत्री बोम्मई म्हणतात त्याप्रमाणे या किरकोळ घटना नक्कीच नाहीत.

  कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या विचारांचा अपमान करण्याच्या घटना वारंवार घडतात व दुसऱ्या बाजूला पंतप्रधान मोदी हे काशीत जाऊन छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा गौरव करतात. बोम्मई यांनी हे तरी समजून घेतले पाहिजे. बेळगावसह सीमा भागात ‘जय भवानी जय शिवाजी’ ही घोषणा द्यायला भाजप सरकारने बंदी घातली आहे. बेळगाव महानगरपालिकेवरील शिवरायांचा भगवा झेंडा जबरदस्तीने खाली उतरवला आहे.

  मनगुत्ती येथील शिवरायांचा पुतळा रातोरात जेसीबी लावून हटवला. हे सर्व कृत्य करताना दिल्लीतील भाजप पुढाऱ्यांना शिवरायांचे शौर्य आठवू नये याचे आश्चर्य वाटते. 2014 साली मोदी महाराष्ट्रात मते मागायला आले तेव्हा शिवाजी महाराजांचे आशीर्वाद मोदींना आहेत अशा आशयाची पोस्टर्स व मोठे फलक सर्वत्र लागले होते. लोकांनी त्यांना त्यामुळे मतदानही केले, पण नंतर शिवाजी महाराजांच्या विश्वासाचे कुठे पानिपत झाले ते समजलेच नाही.

  शिवाजी महाराजांना फक्त निवडणुकीपुरते वापरून घेतले व सोडून दिले असेच लोकांना वाटते. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे हिंदू मने चाळविण्यासाठी मोदी यांनी शिवरायांच्या नावाने भावनिक साद घातली. हे आता नेहमीचेच झाले आहे. बंगळुरूत शिवरायांचा अपमान झाला, त्याचे पडसाद महाराष्ट्रासह देशभरात उमटणे स्वाभाविक आहे, पण महाराष्ट्रातील भाजप पुढारी या विषयावर उसळून उठायचे सोडाच, पण सळसळ करायलाही तयार नाहीत. त्यांनी कागदी निषेधाचे बाण चालवले आहेत.

  एरवी महाराष्ट्रात असे काही घडले की, राजभवनावर त्यांचे ‘जथेच्या जथे’ पोहोचतात व सरकार बरखास्तीची मागणी करतात. कर्नाटकातील घटनेनंतर हे का होऊ नये? फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शे-पाचशे जणांच्या भाजप शिवप्रेमींनी बंगळुरूत तळ ठोकूनच बसले पाहिजे व राजभवनात वारंवार जाऊन बोम्मई सरकार बरखास्तीची मागणी करत राहिले पाहिजे. तरच ते जातिवंत शिवप्रेमी, पण कर्नाटकात वेगळे व महाराष्ट्रात जगावेगळे अशी भाजपवाल्यांची एकंदरीत तऱ्हा दिसते.