जगदंबा तलवारीसाठी शिवप्रेमी पन्हाळ्यात; लेखी आश्‍वासनाशिवाय सज्जाकोठीतून हलणार नाही

छत्रपती शिवरायांची जगदंबा तलवार भारतात परत आणावी यासाठी कोल्हापुरातील शिवदुर्ग संवर्धन आंदोलनच्या तरुणांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र, शासनाकडून या मागणीची दखल घेतली जात नसल्याने शिवभक्तांनी आज थेट ऐतिहासिक पन्हाळा गडावरील सज्जाकोटीमध्ये आंदोलन सुरू केले.

  मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार मायदेशी परत आणावी यासाठी शिवप्रेमींनी थेट पन्हाळा किल्ल्याच्या सज्जाकोठीत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. सरकारचे लेखी आश्‍वासन मिळत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.

  शासन दखल घेत नाही म्हणून शिवदुर्ग संवर्धनचे आंदोलन

  छत्रपती शिवरायांची जगदंबा तलवार भारतात परत आणावी यासाठी कोल्हापुरातील शिवदुर्ग संवर्धन आंदोलनच्या तरुणांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र, शासनाकडून या मागणीची दखल घेतली जात नसल्याने शिवभक्तांनी आज थेट ऐतिहासिक पन्हाळा गडावरील सज्जाकोटीमध्ये आंदोलन सुरू केले. जोपर्यंत आम्हाला शासनाकडून जगदंबा तलवार परत आणण्याबाबत लेखी उत्तर मिळत नाही तोपर्यंत सज्जाकोटी मधुन उठणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

  इंग्लंडच्या राणीपर्यंत निरोप पोहोचावा म्हणूनही केला होता प्रयत्न

  गेल्या काही दिवसांपूर्वी शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाच्या माध्यमातून कोल्हापुरात रास्तारोको करत आंदोलन करण्यात आले होते. शिवाय हा विषय इंग्लंडच्या राणीपर्यंत पोहोचावा म्हणून ज्या ठिकाणी इंग्लंड आणि भारत दोघांमध्ये क्रिकेट सामना होणार होता त्या मैदानावरच भगवा ध्वज फडकवत आंदोलन करण्यात आले होते. आता शिवभक्त आणखी आक्रमक झाले असून थेट पन्हाळा गडावरील सज्जाकोटीमध्ये आंदोलनाला बसले आहेत. शिवरायांच्या अनेक महत्त्वाच्या तलवारींपैकी एक असलेली जगदंबा तलवार भारतात परत आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता सुद्धा शिवभक्त आक्रमक झाले आहेत. शिवाय शासनाकडून जोपर्यंत लेखी उत्तर दिले जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा सुद्धा या आंदोलकांनी दिला आहे.

  सेंट जेम्स पॅलेस येथे आहे ही तलवार

  छत्रपती शिवरायांच्या अनेक तलवारींपैकी एक प्रमुख तलवार करवीर छत्रपती घराण्याकडे होती. तिचे जगदंबा तलवार असे नाव होते. आज इंग्लंडच्या राणीच्या व्यक्तिगत संग्रहात असणार्‍या रॉयल कलेक्शन ट्रस्ट या ठिकाणी सेंट जेम्स पॅलेस येथे ही तलवार ठेवण्यात आली आहे. कोल्हापूर छत्रपतींच्या गादीवर छत्रपती महाराज चौथे हे अकरा वर्षांचे असताना इंग्लंडचा तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स (सातवा एडवर्ड) हा भारत भेटीवर आला होता. सन १८७५- ७६ मध्ये त्यांना हीच जगदंबा तलवार भेट म्हणून दिली होती. हीच इंग्लंड येथे असणारी जगदंबा तलवार भारतात परत यावी, अशी शिवभक्तांची भावना आहे.

  छत्रपती शिवाजी महाराज यांची इंग्लंड मध्ये असलेली तलवार महाराष्ट्रात यावी यासाठी आम्ही अनेक दिवस आंदोलन करत आहे पण, केंद्र आणि राज्य शासनाने अजून दाखल घेतलेली नाही, आज आम्ही पन्हाळगडावरील शिवाजी महाराजांच्या मंदिरात पूजा करून आज सज्जाकोठीमध्ये बसलो आहोत. जो पर्यंत आम्हाला प्रशासनाने लेखी उत्तर दिले नाही तर आम्ही इथून टोकाची भूमिका घेऊ.

  हर्षल सुर्वे, शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाचे प्रमुख