मुंबईतील रस्ते कामांवरून शिवसेना – भाजपमध्ये जुंपली, निविदा रद्द करून फेर निविदा काढण्याची भाजपची मागणी

मुंबईकरांना खड्डेमुक्त व चांगले रस्ते (Roads Of Mumbai)मिळण्यासाठी ३० टक्के रस्ते रकमेच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. मात्र कमी खर्चाच्या कंत्राटामुळे मुंबईतील रस्ते कामे चांगल्या दर्जाची होणार का यावर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

  मुंबई: मुंबईतील(Mumbai) रस्ते कामांसाठी(Road Work Of Mumbai) काढण्यात आलेल्या कमी खर्चाच्या निविदा तात्काळ रद्द करून फेरनिविदा काढण्याची मागणी भाजपने(BJP) केली आहे. मात्र याबाबतचा प्रशासनाकडून अद्याप प्रस्तावच आलेला नसताना भाजपकडून आक्षेप कशासाठी असा सवाल शिवसेनेने(Shivsena) विचारला. चांगले रस्ते मिळणे आवश्यक आहे, मात्र भाजपकडून कमी खर्चाच्या निविदा काढल्याचे सांगत रस्ते कामांत खोडा घातला जातो आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे रस्ते कामांवरून शिवसेना – भाजपमध्ये जुंपली आहे.

  मुंबईकरांना खड्डेमुक्त व चांगले रस्ते मिळण्यासाठी ३० टक्के रस्ते रकमेच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. मात्र कमी खर्चाच्या कंत्राटामुळे मुंबईतील रस्ते कामे चांगल्या दर्जाची होणार का यावर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यामुळे या निविदा रद्द करून फेर निविदा मागवा असा हरकतीचा मुद्दा मांडून शुक्रवारी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीचे लक्ष वेधले.गेल्या २५ वर्षातील रस्त्यांच्या विविध कामांची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करा, अशी मागणीही त्यांनी केली.

  मुंबई महापालिका हद्दीतील रस्त्याची दुर्दशा रस्त्यावरील आणि रस्त्याच्या साईड स्ट्रीपवरील खड्डे याबाबत दरवेळी प्रश्न चिन्ह उभारले जाते. महापालिकेने वर्ष १९९७ ते वर्ष २०२१ पर्यंत २१००० कोटी रुपये खर्च करूनही मुंबईकरांना महापालिका खड्डेमुक्त रस्ते देऊ शकलेली नाही हे विदारक सत्य आहे. महापालिका हद्दीतील अंदाजे १९५० किलोमीटर रस्त्यांपैकी सुमारे ७५० किलोमीटर रस्त्यांचे म्हणजे ४० टक्के रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण झालेले आहे. उर्वरित ६० टक्के रस्त्यांपैकी निम्म्या रस्त्यांचे काम गेल्या ५ वर्षात केल्यामुळे हे रस्ते दोषदायित्व कालावधीमध्ये आहेत. दोषदायित्व कालावधीत या रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती रस्त्याचे काम करणाऱ्या मूळ कंत्राटदारानेच करायची आहे. विविध उपयोगिता सेवा यांच्याकडून खणलेल्या चरी बुजविण्यासाठी आपण दुप्पट, तिप्पट दराने शुल्क आकारतो. या चर भरण्यासाठी दरवर्षी ३५० ते ४०० कोटी कंत्राटदाराच्या घशात घातले जातात. पण चर नीट न भरल्याने पुन्हा खड्डे आणि खड्डे भरण्यासाठी पुन्हा कंत्राट हे अर्थचक्र गेले २५ वर्षे असेच सुरु आहे, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.

  या वर्षीही रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे १२०० कोटी किंमतीच्या ३१ निविदा काढण्यात आल्यात. या सर्व निविदांमध्ये कंत्राटदारांनी उणे २६ टक्के ते उणे ३३ टक्के रक्कम भरण्यात आली आहे. कंत्राटदाराने उणे १२ टक्केपेक्षा जास्त उणे रक्कम भरली असेल तर कंत्राटदाराला अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम महापालिकेकडे जमा करावी लागते. या सर्व बाबींची बेरीज केली असता व त्यावरील चक्रवाढ व्याज विचारात घेतले असता रस्त्यांचे कंत्राटदार हे कार्यालयीन अंदाजापेक्षा ४० टक्के ते ५० टक्के कमी किंमतीत काम करण्यास तयार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना भविष्यात खड्डेयुक्त रस्त्यावरून वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे फेरिनिविदा काढा, अशी मागणी भाजपने केली.

  रस्ते कामांची श्वेतपत्रिका काढा
  पूर्वी कंत्राटदार रस्त्याच्या कामाबाबत निकष कठोर असल्यामुळे फारसे उत्सुक नसायचे आणि फारशी उणे रक्कम भरली जात नसे. परंतु गेल्या काही वर्षात रस्त्याच्या निविदा कंत्राटदार प्रकर्षाने उणे उणे रक्कम भरत आहेत असे निदर्शनास येते. हे गौडबंगाल नक्की काय आहे ? यापूर्वीही वेळोवेळी महापालिकेच्या लेखा परीक्षण व अभियांत्रिकी दक्षता विभागाने रस्त्यांच्या कामांबाबत ताशेरे ओढलेले आहेत. त्याचा सविस्तर अहवाल स्थायी समितीसमोर येणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा उलगडा होण्यासाठी महापालिकेने गेल्या २५ वर्षातील रस्त्यांच्या विविध कामांची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

  रस्ते कामांच्या निविदा प्रक्रियेवर प्रस्ताव नसताना भाजपकडून लघुत्तम निविदा काढल्या म्हणून आक्षेप घेणे योग्य नाही. आधीच रस्ते कामांना उशीर झाला असताना भाजपकडून या कामांबाबत राजकारण करून मुंबईकरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरु आहे. या कंत्राटात भाजपचे ठेकेदार आले नाहीत म्हणून त्यांचा आटापिटा सुरु आहे. कमी खर्चाच्या निविदा आल्या तर पालिकेचा फायदाच होणार आहे. मात्र फेर निविदा काढल्याने नुकसान होणार आहे. भाजपची ही भूमिका रस्ते कामांत खोडा घालण्याची आहे.असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हटले आहे.