दुकानदारांकडे खायला पैसे नाहीत, सरकारी खर्चातून पाट्या बदलून द्या, खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

मागील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने मराठी पाट्या अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. यावर विविध प्रतिक्रिया आणि राजकारण रंगत आहे. या निर्णयाचे अनेक स्तरातून स्वागत केले जात आहे. मात्र या निर्णयावर एमआयएमचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुकानदाराकडे सध्या खायला पैसे नाहीत आणि पाट्या कशा बदलणार, असा सवाल त्यांनी केला आहे.

    औरंगाबाद : मागील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने मराठी पाट्या अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. यावर विविध प्रतिक्रिया आणि राजकारण रंगत आहे. या निर्णयाचे अनेक स्तरातून स्वागत केले जात आहे. मात्र या निर्णयावर एमआयएमचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुकानदाराकडे सध्या खायला पैसे नाहीत आणि पाट्या कशा बदलणार, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच सरकारला जर मराठी (Marathi) वर प्रेम असेल तर सरकारी खर्चातून दुकानाच्या पाट्या बदलून द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.  दरम्यान, जलील यांच्या या भूमिकेनंतर महाराष्ट्रात राहयाचे असेल तर, मराठी लावाव्या लागतील असं शिवसेना आणि मनसेनं म्हटलं आहे.

    दरम्यान, कामगार संख्या 10 पेक्षा कमी असलेल्या आस्थापना, तसेच 10 पेक्षा अधिक असलेल्या आस्थापना, अशा सर्व आस्थापना, देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करतील. मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपी बरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो. मात्र, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये, असे राज्य सरकारच्या आदेशात सांगण्यात आले आहे. पण याला काही गुजराती व्यावसायिकांनी सुद्धा विरोध केला आहे.

    सध्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळं राज्यातील छोटे मोठे दुकानदार कोलमडून पडले आहेत, त्यांच्याकडे व्यवसाय आणि खायला पैसे नाहीत, तर मराठी पाट्यासाठी कुठून पैसे आणणार, त्यामुळं “सरकारला जर मराठीवर प्रेम असेल तर सरकारी खर्चातून दुकानाच्या पाट्या बदलून द्याव्यात” अशी प्रतिक्रिया जलील यांनी दिली आहे. राज्य सरकारने 12 जानेवारीच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील सर्व दुकानांचे नामफलक मराठी भाषेतूनच असावते असा निर्णय घेतला होता.

    दरम्यान, या निर्णयानंतर मराठी पाट्यांचा सर्वप्रथम मुद्धा मनसेनं उचलला होता, आणि हे श्रेय मनसेचं आहे असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. तर शिवसेना सुद्धा यात मागे नाहीय, शिवसेना सुद्धा हे श्रेय घेण्यासाठी पुढे सरसावली आहे. आगामी काळात मराठी पाट्या दुकानांवर लागल्या नाहीतर, मराठी पाट्या तयार करण्यात खर्च जास्त आहे की दुकांनाच्या काचा यांच्या खर्च अधिक आहे, हे दुकानदारांनी ठरवावे, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे.