सासूवर बलात्कार केल्याचा जावयावर आरोप; तरीही अटकपूर्व जामीन मंजूर, फिर्यादीच्या आरोपावर उच्च न्यायालयाने व्यक्त केली शंका

जर आरोपीने सासूला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले असे मानले, तर तिने त्याच पुरुषाला तिच्या मुलीशी लग्न करण्याची परवानगी कशी दिली ? ही अत्यंत अशक्य अशी बाब असल्याचे नमूद करत न्यायालयाने सासूच्या आरोपांवर शंका व्यक्त करत आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

  • बलात्कार झाल्यावरही सासूने मुलीचे लग्न आरोपीशी कसे लावले?

मुंबई : सासूशी (Mother In Law) जबरदस्तीने शारीरिक संबध (Physical contact) ठेवल्याचा आरोप असलेल्या आरोपी जावयाला नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) अटकपूर्व जामीन (Bail) मंजूर केला. कथित घटना २०१९ आणि २०२० च्या असल्याचे एफआयआरमध्ये (FIR) म्हटले आहे. मात्र, एफआयआर हा मागील वर्षी दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपी आणि फिर्यादी सासूची मुलगी यांचा विवाह झाला.

जर आरोपीने सासूला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले असे मानले, तर तिने त्याच पुरुषाला तिच्या मुलीशी लग्न करण्याची परवानगी कशी दिली ? ही अत्यंत अशक्य अशी बाब असल्याचे नमूद करत न्यायालयाने सासूच्या आरोपांवर शंका व्यक्त करत आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

कमलाबाई (नाव बदलण्यात आले आहे) या २०१७ मध्ये, पती, दोन मुलींसह उल्हासनगरमधील एका अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. त्या सोसायटीचा आरोपी सचिव म्हणून काम पाहत होता. सोसायटीच्या कामानिमित्त त्याचे कमलाबाईंच्या घरी येणे जाणे होते. त्यातच जानेवारी आणि फेब्रुवारी २०१८ त्याने कमलाबाई या घरात एकट्या असल्याचा फायदा उचलत त्याने तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

तिने याबाबत बाहेर वाच्चता केल्यास तिची बदनामी करेन अशी धमकीही त्याने दिली. त्यानंतर आरोपी आणि कमलाबाई यांच्या मुलीचे एकमेकांवर प्रेम जडले आणि कुटुंबियांनी १५ जून २०१८ रोजी दोघांचे लग्न लावून दिले. जुलै २०१९ रोजी त्यांनी मुलालाही जन्म दिला. फेब्रुवारी २०२० मध्ये आरोपी कमलाबाईंच्या घरी आला, त्या घरी एकट्याच असल्याचा फायदा उचलून त्यांच्याकडे शारिरीक संबंधाची मागणी केली, त्यांनी नकार दिल्यानंतर त्याने जबरदस्ती करून कमलाबाईंवर लैंगिक अत्याचार केले.

डिसेंबर २०२० मध्ये आरोपीचे कमलाबाईंच्या मुलीशी (त्याच्या पत्नीशी) भांडण झाले आणि ती माहेरी आपल्या आईकडे निघून आली. त्यावेळी कमलाबाईंनी मुलीला घटनेबदद्ल माहिती दिली आणि दोघींनी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी जावयाविरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३७६, (बलात्कार) ५०६ (धमकावणे) अंतर्गत गुन्हा नोंदवला. त्याविरोधात आरोपी जावयाने अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालायत धाव घेतली होती.

त्यावर नुकतीच न्या. सारंग कोतवाल यांच्यासमोर सुनावणी पार पडली. आरोपी आणि त्यांच्या पत्नीमधील वादविवादांमुळे मार्च २०२१ पासून घटस्फोटाचा खटला सुरू असून पत्नीने याचिकाकर्त्या आरोपीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले आहेत. मात्र, सासूने केलेले आरोप आणि नोंदविण्यात आलेला गुन्हा हा त्या प्रकरणी याचिकाकर्त्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा दावा आरोपीच्यावतीने बाजू मांडताना ॲड.डिंपल जोशी यांनी केला. सासूने केलेले आरोप हे चुकीचे, खोटे आणि जाणूनबुजून गोवण्यात आल्याचा दावाही जोशी यांनी केला.

त्यांची बाजू ऐकून घेत याचिकाकर्त्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोप हे सत्यतेबदद्ल खात्री निर्माण करत नाहीत. फेब्रुवारी २०१८ मध्ये आरोपीने सासुसोबत गैरवर्तन केले, तरीही तिने स्वेच्छेने त्याला आपल्याच मुलीशी लग्न करण्यास परवानगी दिली त्यांचे हे वर्तनच अनैसर्गिक भासत असल्याचे न्या. कोतवाल यांनी नमूद केले आणि खटल्याच्या या कलम ३७७ अंतर्गत दाखल केलेला गुन्ह्यावर शंकाही उपस्थित होत असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने याचिकाकर्त्या आरोपीचा अर्ज मान्य करून अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच अटक झाल्यास ३० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्याचे निर्देश दिले.