एसटी कर्मचारी संघटनेच्या नेत्यांचे शरद पवारांसमोर महामंडळातील प्रश्नाचे गा-हाणे; फडणवीसांच्या काळातच वाटोळे झाल्याचा आरोप

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात एसटी कर्मचारी संघटना सदस्य नोंदणीच्या नावावर पैसे उकळण्याचे धंदे करत असल्याचे वक्तव्य केले त्यावर एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक), एसटी कामगार सेना आणि कास्ट्राईब एसटी कर्मचारी संघटनेने जाहीर निषेध करून, फडणवीसांच्या काळातच एसटीचे वाटोळे झाल्याची टीका केली आहे. एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक), एसटी कामगार सेना आणि कास्ट्राईब एसटी कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी सिल्व्हर ओक येथे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यासमोर सध्याच्या महामंडळातील प्रश्नाचे गा-हाणे मांडले आहे. यावेळी पवार यानी या प्रश्नात लक्ष घालण्यासाठी मुख्यमंत्र्यासमवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येत आहे.

    मुंबई : भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात एसटी कर्मचारी संघटना सदस्य नोंदणीच्या नावावर पैसे उकळण्याचे धंदे करत असल्याचे वक्तव्य केले त्यावर एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक), एसटी कामगार सेना आणि कास्ट्राईब एसटी कर्मचारी संघटनेने जाहीर निषेध करून, फडणवीसांच्या काळातच एसटीचे वाटोळे झाल्याची टीका केली आहे. एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक), एसटी कामगार सेना आणि कास्ट्राईब एसटी कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी सिल्व्हर ओक येथे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यासमोर सध्याच्या महामंडळातील प्रश्नाचे गा-हाणे मांडले आहे. यावेळी पवार यानी या प्रश्नात लक्ष घालण्यासाठी मुख्यमंत्र्यासमवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येत आहे.

    शरद पवार यांच्यासमोर गा-हाणे

    एसटी महामंडळातील कर्मचा-यांच्या अनियमित वेतन व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत. दुर्देवाने एस.टी. कर्मचा-यांनी कोरोनाच्या संकट काळात काम करुन सुध्दा एसटी महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परंतु अशा परिस्थितीत एसटी कर्मचा-यांनी धीर न सोडता संघर्ष करण्यासह परिस्थितीवर मात करणे आवश्यक आहे. तथापि, कर्मचा-यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे जनक शरद पवार यांच्यासमोर या नेत्यांनी गा-हाणे घातले आहे. याबाबत लवकरच संघटनांच्या वतीने भूमिका जाहिर केल्या जाणार असल्याचे या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

    पडळकरांनी घेतला कर्मचा-यांच्या भावनेचा गैरफायदा

    एसटी कर्मचा-यांच्या असंतोषाच्या भावनेचा भारतीय जनता पार्टीचे नेते राजकीय वापर करत आहे. फडणवीस सरकारच्या काळात एसटी महामंडळाकडे व एस.टी. कर्मचा-यांकडे तत्कालीन मुख्यमंत्र्यानी दुर्लक्ष केले. परंतु आता केवळ राजकीय व्देषापोटी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर कर्मचा-यांच्या भावनेचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने अनेक भडकाऊ व असंवैधानिक विधाने करून अपमानास्पद भाषा वापरतात. त्यामुळे भडकाऊ व असंवैधानिक विधाने करुन एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन करणा-या व एसटी कर्मचा-यांच्या भावनेचे राजकारण करणा-यांचा एसटी कर्मचारी वर्कर्स काँग्रेसचे (इंटक) सरचिटणीस मुकेश तिगोटे, एसटी कामगार सेनेचे हिरेन रेडकर, तर कास्ट्राईब एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनील निरभवणे यांनी जाहिर निषेध केला आहे.