nitin raut

रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर महावितरण, महापारेषण व महानिर्मिती यांच्या तयारीचा आढावा(Meeting In Mantralay) ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut)यांनी आज मंत्रालयात आयोजित एका बैठकीत घेतला.

  मुंबई: रब्बी हंगामात शेतकऱ्यांना उत्तम प्रकारे सेवा देण्यासाठी आणि रोहित्रे नादुरुस्त होऊ नयेत यासाठी ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून वीज पुरवठा अखंडित राहील(Continuous Electricity Supply To Farmers) याची काळजी घ्यावी, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut)यांनी दिले. रोहित्र बंद पडून वीज पुरवठा ठप्प होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

  रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर महावितरण, महापारेषण व महानिर्मिती यांच्या तयारीचा आढावा(Meeting In Mantralay) ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मंत्रालयात आयोजित एका बैठकीत घेतला. या बैठकीत राज्याच्या ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, संचालक (संचालन) संजय ताकसांडे, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे यांच्यासह ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  गेल्या वर्षी २०२० च्या रब्बी हंगामामध्ये तिन्ही कंपन्यांनी उत्तम समन्वय साधून ग्राहकांना खास करून कृषि ग्राहकांना चांगली सेवा पुरवली याबद्दल तिन्ही कंपन्यांचे ऊर्जामंत्र्यांनी अभिनंदन केले.

  याही वर्षी महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडत आहे. किंबहुना दुष्काळी भागातही अतिवृष्टी होत आहे. तसेच हळुहळु लॉकडाऊन मागे घेतला जात असून जीवन पूर्वपदावर येत आहे. यामुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासाठी मागील वर्षीप्रमाणेच तिन्ही कंपन्यांनी पुन्हा समन्वय साधून २०२१ चा रब्बी हंगामात शेतकऱ्यांना उत्तम प्रकारची सेवा देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

  सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना सतर्क राहुन पुरेशी काळजी घेण्यास सांगावे. महावितरणच्या मुंबई मुख्यालयाने तेलाचा व वितरण रोहित्रांचा पुरेसा साठा उपलब्ध करावा जेणेकरून मागणीनुसार त्याचा पुरवठा केला जाईल. यंत्रणेची पूर्व हंगामी दुरूस्ती वेळेवर करावी. यंत्रसामुग्री व देखभालीसाठी लागणारे साहित्य क्षेत्रीय कार्यालयांना वेळेवर उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना डॉ. राऊत यांनी केल्या.नादुरुस्त रोहित्र तत्काळ दुरुस्त करावे व तेलाचा पुरवठा त्वरीत करता येईल यासाठी तेलाचा पुरेसा साठा ठेवावा, असे निर्देशही त्यांनी दिले आहे.

  रोहित्रे, यंत्रणा वारंवार ना-दुरूस्त होण्यामागील कारणांचा सखोल अभ्यास करून मुळासकट याचे निवारण करण्यासाठी तातडीने उपाय हाती घ्यावे.सोबत वीज चोरीला कसा आळा घालता येईल याचा तसेच महावितरणची हानी कशी टाळता येईल याचेही वरिष्ठांनी नियोजन करून क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

  स्थानिक लोकप्रतिनिधी जसे खासदार, आमदार जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच इत्यादींशी चांगला जनसंपर्क ठेवून परिस्थिती आपण कशी हाताळणार याची कल्पना देण्याची सूचनाही त्यांनी केली.ज्याठिकाणी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल अशा ठिकाणी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी, तहसिलदार संबधीत पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची मदत घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

  सध्या सर्वदूर अतिवृष्टी चालू आहे. अशाप्रसंगी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाला थांबणे आवश्यक आहे. याबाबत सर्वांना सूचना द्याव्यात, असे निर्देशही ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले आहेत. वीज विकत घेण्यासाठी महावितरणला वीज पुरवठादाराना रोजच पैसे द्यावे लागते. तसेच देखभाल व दुरुस्तीवर खर्च होत असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या चालू बिलासोबत थकबाकी भरावी. शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त करण्यासाठी नवीन कृषिपंप धोरण तयार करण्यात आले असून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ राऊत यांनी शेतकऱ्यांना केले आहे.