
मुंबई : वरळीतील बीडीडी चाळीतील गॅस सिलिंडर स्फोटात चिमुकल्याचा मृत्यू झाला. यावरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपने केला होता. पत्रकार परिषदेत बोलत असताना भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्याची गंभीर दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे.
या संदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, “जबाबदार लोकप्रतिनिधींनी महिलांच्या संदर्भात केलेली कोणतीही अवमानकारक वक्तव्य अजिबात खपवून घेतली जाणार नाहीत. त्यामुळे राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून यासंदर्भातील वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगाला पाठवून देण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे दिले आहेत. मुंबईच्या प्रथम नागरिक तथा महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्याबद्दल बोलताना भाजपा आमदार आशिष शेलार यांनी अत्यंत बेताल वक्तव्य केल्याचे समाजमाध्यमातून प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले.”
काय म्हणाले होते शेलार?
आशिष शेलार यांनी म्हणाले होते, बीडीडी चाळीत जो सिलेंडर ब्लास्ट झाला. त्यामध्ये नागरिक गंभीर जखमी झाले. त्यामध्ये एका बाळाचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार टाळक फिरवणारा आहे. नायर रुग्णालयात 45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ दुर्लक्ष झाले, असा आरोप शेलार यांनी केला होता. तर सिलिंडर स्पोटानंतर ७२ तासानंतर मुंबई महापौर पोहचतात, एवढे तास कुठे निजला होतात? असे शेलार म्हटल्याचा उल्लेख चाकणकर यांनी पत्रात केला आहे. या घटनेत चार महिन्याच्या बाळाचा मृत्यु झाला. भायखळ्याचे गुंड सभागृहाबाहेर स्थायी समिती अध्यक्षांनी आणून ठेवले होते. यशवंत जाधव यांनी सभागृहात आमच्या नगरसेविकांना धमकी दिली. कोरोना काळात इतके गुंड सभागृहाबाहेर आणून गर्दी केली. यशवंत जाधव यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शेलार यांनी केली होती.