महामंडळ, एस.ई.ओ. पदाच्या नियुक्त्या जाहीर करा, काँग्रेसच्या माजी सचिवाचं नाना पटोलेंना निवेदन

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे जोपर्यंत पदावर आहेत तोपर्यंत राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या पत्रावर सही करतील अशी शक्यता दिसत नाही, असे जुन्नरकर यांनी म्हटले आहे.

    मुंबई : महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन १३ महिने पूर्ण झाले असून अद्यापही एस. ई. ओ व महामंडळ नियुक्त्यादेखील झालेल्या नाहीत. त्यामुळे एस.ई. ओ. आणि महामंडळ नियुक्त्या त्वरित करण्यात याव्यात यासाठी मुंबई काँग्रेसचे माजी सचिव धनंजय जुन्नरकर यांनी महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन दिले आहे.

    महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे जोपर्यंत पदावर आहेत तोपर्यंत राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या पत्रावर सही करतील अशी शक्यता दिसत नाही, असे जुन्नरकर यांनी म्हटले आहे. सध्या राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध पाहता तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नेत्यांची वर्णी सहजासहजी लागणे दुरापास्त वाटत आहे. त्यांना पत्र देऊन व पद रिक्त राहून एक वर्ष व्हायला आले आहे.

    महाराष्ट्रात तीन पक्षाची सत्ता असून त्यात काँग्रेसला सर्वात कमी वाटा मिळालेला आहे. येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीआधी कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, जोश निर्माण व्हावा हे अत्यंत गरजेचे आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना गेल्या सहा-सात वर्षांत कोणतीही शासकीय पदे मिळालेले नाही. कार्यकर्ते ही पक्षाची ताकद असतात सर्वांनाच पक्ष तिकीट देऊ शकत नाही, अशा वेळी चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ पदाधिकारी यांना न्याय देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.