सचिन वाझेंची ‘ईडी’कडून कडक चौकशी? महागड्या गाड्या आणि पैसे मोजण्याची मशीनमुळे आले संकटात

अंबानी स्फोटक प्रकरणातील मुख्य संशयित सचिन वाझे आता आणखीनच गोत्यात येण्याची शक्‍यता आहे. कारण, NIA च्या तपासात सचिन वाझे यांच्याकडे असणाऱ्या अलिशान गाड्यांची माहिती समोर आली आहे.

  मुंबई (Mumbai).  अंबानी स्फोटक प्रकरणातील मुख्य संशयित सचिन वाझे आता आणखीनच गोत्यात येण्याची शक्‍यता आहे. कारण, NIA च्या तपासात सचिन वाझे यांच्याकडे असणाऱ्या अलिशान गाड्यांची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता सचिन वाझे यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाची (ईडी) वक्रदृष्टी वळाली आहे.

  सूत्रांच्या माहितीनुसार, ‘ईडी’कडून आता सचिन वाझे यांच्या बेहिशेबी मालमत्तेची तपासणी होऊ शकते. अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात सचिन वाझे यांच्याकडून मर्सिडीज, प्राडो यासारख्या अलिशान गाड्यांचा वापर झाला होता. साहाय्यक पोलीस निरीक्षक असणाऱ्या सचिन वाझे यांनी एवढ्या महागड्या गाड्या कशा घेतल्या, त्यासाठी त्यांच्याकडे पैसा कुठून आला?

  सचिन वाझे यांनी गाडीत पैसे मोजण्याचे मशीन का ठेवले होते?, असे अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे NIA सचिन वाझे यांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या तपासाचे प्रकरण ‘ईडी’कडे देऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

  ‘परमबीर सिंहांच्या १०० कोटींच्या लेटरबॉम्बची चौकशी करणार?
  राष्ट्रीय तपास यंत्रणेनंतर आता महाविकासआघाडी सरकारच्या मागे आणखी एका केंद्रीय यंत्रणेचा ससेमिरा लागण्याची शक्‍यता आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्‍त परमबीर सिंह यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना बार आणि रेस्टॉरंटसकडून 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा दावा परमबीर सिंह या पत्रात केला होता.

  ही रक्‍कम खूपच मोठी असल्याने आता सक्तवसुली संचलनालय (ईडी) स्वत:हून या प्रकरणाची चौकशी करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या अडचणीत आणखीनच भर पडू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या ‘ईडी’कडून परमबीर सिंह यांच्या दाव्यातील तथ्य तपासण्याचे काम सुरु आहे. ईडी यासंदर्भातील सगळ्या घडामोडीवर नजर ठेवून आहे. 100 कोटींचा आकडा हा खूपच मोठा आहे. त्यामुळे ‘ईडी’कडून आता या प्रकरणाची चौकशी होऊ शकते. तसे झाल्यास ईडी पोलीस अधिकारी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौकशीच्या जाळ्यात खेचण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.