कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन मुख्यमंत्र्यांना सुचवा- भातखळकरांचा टोला

मुख्यमंत्र्यांच्या घरबशा कारभारामुळे महाराष्ट्रातील स्मशाने अखंड धगधगत आहेत. त्यामुळे मेंदू तल्लख करेल आणि कार्यक्षमता निर्माण करेल असे एखादे आसन मुख्यमंत्र्यांना सूचवा असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

    मुंबई: कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन मुख्यमंत्र्यांना सूचवा, असा टोला भातखळकर यांनी व्टिट करत मुख्यमंत्र्यांना लगावला  आहे. जागतिक योग दिनाचा संदर्भ देत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यावर व्टिट करत टिका केली आहे.
    युतीच्या चर्चा, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
    शिवसेना आणि भाजप यांच्यात पुन्हा युतीच्या चर्चा एकीकडे होत असतानाच दुसरीकडे नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी देखील सुरू आहेत. जागतिक योग दिवस आहे हे लक्षात घेता आपण भाजपसाठी कोणते आसन सूचवाल?, असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी खासदार संजय राऊत यांना केला होता. त्यावर ‘शवासन’ असे उत्तर राऊत यांनी दिले होते. त्यावर भातखळकर यांनी हा पलटवार केला आहे.

    घरबशा कारभारामुळे स्मशाने धगधगत आहेत
    अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांवर त्यांच्या घरी राहून काम करण्यावर भाष्य केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कारभाराला ‘घरबशा कारभार’ असा केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरबशा कारभारामुळे महाराष्ट्रातील स्मशाने अखंड धगधगत आहेत. त्यामुळे मेंदू तल्लख करेल आणि कार्यक्षमता निर्माण करेल असे एखादे आसन मुख्यमंत्र्यांना सूचवा असे भातखळकर यांनी म्हटले आहे.