corona in dharavi

मुंबई महापालिकेने (BMC) सुपर स्प्रेडरची शोध मोहीम (Super Spreader Search Operation In Mumbai) हाती घेतली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने संशयितांचा शोध घेण्याकडे आरोग्य विभागाने मोर्चा वळवला आहे.

    मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला (Corona Third Wave) रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने (BMC) सुपर स्प्रेडरची शोध मोहीम (Super Spreader Search Operation In Mumbai) हाती घेतली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने संशयितांचा शोध घेण्याकडे आरोग्य विभागाने मोर्चा वळवला आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ४५ हजार ६५० व्यक्तींचा शोध घेतला आहे. दरम्यान, यापैकी ५४२ व्यक्तींना कोरोना कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागातील (Health Department) अधिकाऱ्याने सांगितले.

    कोरोनाच्या दोन्ही लाटा परतवण्यात पालिकेला यश आले असतानाच तिसऱ्या लाटेने मुंबईत धडक दिली आहे. कोरोना आणि ओमायक्राॅन विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने योग्य ते नियोजन केले असून बाधित रुग्णांवर वेळीच उपचार करता यावे यासाठी बेड्सची उपलब्धता वाढवण्यात आली आहे. तर कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी सुपर स्प्रेडर व्यक्तींची शोध मोहीम पालिकेने हाती घेतले आहे. ज्या कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने अन्य व्यक्तीला कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असते, अशा कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची शोध मोहीम पालिका आरोग्य विभागाने सुरु केली आहे. मुंबईच्या विविध भागातून गेल्या २४ तासांत ४५ हजार ६५० व्यक्ती ज्या अति जोखीम कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्या होत्या. तर अति जोखीम जनसंपर्कतील ५४२ व्यक्तींचा शोध घेत कोरोना काळजी केंद्र १ मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

    कोरोनाचा प्रादुर्भाव हा एकमेकांच्या संपर्कात आल्याने होत असून पालिकेच्या आरोग्य विभागाने २४ विभागांमध्ये आरोग्य स्वंयसेविका व स्थानिक स्वयंसेवक घरोघरी व झोपडपट्टीत जाऊन सर्वेक्षण करत आहेत. मुंबईच्या २४ विभागातील सर्वेक्षणासाठी टीम तयार केली आहे. ही टीम घरांचे सर्वेक्षण करत असून ही सर्वेक्षण मोहीम एखाद्या विभागात एकदा राबवली गेली असली तरी पुन्हा त्याच भागात जाऊन पुन्हा सर्वेक्षण करते. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख २५ हजार १४४ व्यक्तींच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. घरोघरी जाऊन तपासणी करत संशयितांचे स्वॅब घेणे, अँटिजेन टेस्ट यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने २१ हजारांवर आढळणारी रुग्ण संख्या १२ हजारांवर आणण्यात पालिका यश आले आहे.