महाराष्ट्रात जुनी समीकरणे नव्याने जुळणार? पुन्हा सेना-भाजप युतीची जोरदार चर्चा, हे आहे कारण

याला कारण ठरलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाढत चाललेली बातचित. गेल्या मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदींना भेटले. त्यावेळी महाआघाडीचे इतर नेतेही होते. मात्र या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि मोदींची एक स्वतंत्र भेट बंद दाराआड झाली आणि गणितं बदलण्याची शक्यता निर्माण झाली.

    राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. गेल्या काही वर्षात तर राजकारण म्हणजे सत्तेची जुळवाजुळव हेच गणित झालंय. महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वीरित्या सुरु झाला. मात्र हा प्रयोग पाच वर्षे टिकेल काय, असा प्रश्न विचारण्याची वेळ पुन्हा एकदा आली आहे.

    याला कारण ठरलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाढत चाललेली बातचित. गेल्या मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदींना भेटले. त्यावेळी महाआघाडीचे इतर नेतेही होते. मात्र या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि मोदींची एक स्वतंत्र भेट बंद दाराआड झाली आणि गणितं बदलण्याची शक्यता निर्माण झाली.

    काही वृत्तसमूहांत आलेल्या बातम्यांनुसार या भेटीनंतरही पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून संवाद झाला असून लवकरच महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतर घडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यात गेल्या काही दिवसांतील घडामोडींवरून महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचं दिसून येतंय. त्यामुळे आता पुन्हा एकदा सेना-भाजप एकत्र येणार का, असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गेल्या आठवड्यात स्वबळाची भाषा केली होती. स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याचं पटोलेंनी म्हटलं होतं. तर आलात तर सोबत, अन्यथा वेगवेगळे अशी भूमिका शिवसेना आणि राष्ट्रवादीनं घेतली होती. या पार्श्वभूमीवर महायुतीतील हा बेबनाव पुन्हा सेना-भाजपला एकत्र आणू शकेल काय, या चर्चांनी सध्या जोर धरलाय.