मृत व्यक्तीची कोरोना चाचणी आधी निगेटीव्ह आणि नंतर पॉझिटिव्ह आल्याने टीबी रुग्णालयातील कर्मचारी भयभीत

मुंबई :शिवडीच्या टीबी रुग्णालयात क्षयरोगाचा इतिहास असलेल्या रुग्णाचा बुधवारीमृत्यू झाला. कोरोनाची लक्षण असल्याने त्याचे‌ स्वॅब घेतले असता आधी त्याची कोरोना चाचणी निगेटीव्ह व

 मुंबई : शिवडीच्या टीबी रुग्णालयात क्षयरोगाचा इतिहास असलेल्या रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला. कोरोनाची लक्षण असल्याने त्याचे‌ स्वॅब घेतले असता आधी त्याची कोरोना चाचणी निगेटीव्ह व नंतर पॉझिटिव्ह आली. मात्र तोपर्यंत या रुग्णाला‌ हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये‌ भीती निर्माण झाली आहे. हा‌ संसर्ग कुटुंबियांनाही होऊ नये म्हणून घरी जाण्यास तयार नाहीत. दरम्यान या रुग्णाची कोरोना चाचणी आधी निगेटीव्ह व नंतर पॉझिटीव्ह आल्याच्या घटनेला शिवडी टीबी रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललित आनंदे यांनी दुजोरा दिला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या क्षय रुग्णालयातील वॉर्ड नंबर १८ मधील ७ चतुर्थश्रेणी कामगार, वॉर्ड नंबर १५ मधील १ चतुर्थश्रेणी कामगार तसेच ओ.पी.डी. मध्ये काम करणाऱ्या १ नर्स आणि १ डॉक्टर्स हे कोरोना बाधित झाले आहेत. रुग्णाच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशी रुग्णाचा  कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. या रुग्णाला सोमवारी वॉर्ड नंबर ११ मध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टर्स यांना या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने वॉर्ड नंबर १६ येथे बुधवारी हलविण्यात आले. रुग्णांवर उपचार सुरू असताना गुरुवारी निधन झाले. रुग्णांच्या नातेवाईकांनी शववाहीनीतून शव न नेता रुग्णवाहीकेतून घेऊन गेले. टी. बी. रुग्णालयाच्या कामगारांनी पीपीइ किट न घालता पेशंटची बॉडी रुग्णवाहीकेत नेऊन दिली. यावेळी कर्मचाऱ्यांनी पीपीइ किट घातले नाही. कारण कामगारांना हा रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह असल्याचे माहीतच नव्हते. तर सदर  रुग्णाचा अहवाल दुसऱ्या दिवशी पॉजिटीव्ह आल्याने कामगार, कर्मचारी परिचारिका यांच्यामध्ये मात्र प्रचंड भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

कोरोना  रुग्ण असल्याचे मृत्यू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी समजले, पण यादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने पीपीइ किटही वापरली नाही. शिवाय मृत्यू झालेल्या व्यक्तीला रुग्णवाहीकेतुन नेण्यात आले. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे, असे म्युनिसिपल मजदूर यूनियनचे चीटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले.काही दिवसांपूर्वी देखील रुग्णालयातील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला होता,  त्यावेळी त्याच्या सानिध्यात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांची टेस्ट न करता रात्रभर त्यांना रुग्णालय परिसरात रहावे लागले. प्रशासन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रदीप नारकर यांनी केला आहे.

दरम्यान, कर्मचारी घरी जाणार नसून रुग्णालयातच राहण्याची व्यवस्था करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. यावर टीबी रुग्णालय अधीक्षक डॉ. ललित आनंदे यांनी सांगितले की, या रुग्णाचा कोरोना अहवाल आधी निगेटीव्ह व नंतर पॉझिटीव्ह आला. हा रुग्ण २०१६ पासून उपचार घेत होता. बेडाक्युलीन औषध सुरु होते. तरीही संशय आल्याने केईएम रुग्णालयात पाठवले. मात्र तिकडे जागा उपलब्ध‌ नव्हती. अखेर टीबी रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात त्याला ठेवण्यात आले. त्याचे स्वॅब घेण्यात आले. त्याच दिवशी त्याचे निधन झाले. आयसोलेशन वॉर्डमध्ये कडक सुचना‌ देण्यात आल्या आहेत.