टीसीएस, विप्रो, इन्फोसिस करणार जवळपास १ लाख कर्मचाऱ्यांची भरती, फ्रेशर्संना पण मिळणार नोकरीची संधी

नवीन वर्षात आयटी क्षेत्रात १ लाख नोकरीची संधी आहे. देशातील आघाडीच्या आयटी कंपन्या टीसीएस, विप्रो, आणि इन्फोसिस या आर्थिक वर्षात जवळपास १ लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत. कंपन्यांनी नुकतेच त्यांचे तिसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर, मोठ्या प्रमाणात नफा पोस्ट केल्यानंतर ही घोषणा झाली आहे.

    नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तरुणांसाठी एक चांगली बातमी आणि आनंदाची बातमी आहे, नवीन वर्षात आयटी क्षेत्रात १ लाख नोकरीची संधी आहे. देशातील आघाडीच्या आयटी कंपन्या टीसीएस, विप्रो, आणि इन्फोसिस या आर्थिक वर्षात जवळपास १ लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत. कंपन्यांनी नुकतेच त्यांचे तिसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर, मोठ्या प्रमाणात नफा पोस्ट केल्यानंतर ही घोषणा झाली आहे. या प्रमुख कंपन्यांनी देखील घोषणा केली की ते चालू आर्थिक वर्षामध्ये त्यांची नियुक्ती मोहीम सुरू ठेवतील, ज्यामध्ये गेल्या वर्षी मोठी वाढ झाली होती. त्यामुळं या कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

    दरम्यान, देशातील तीन आघाडीच्या आयटी कंपन्यांनी २०२१ मध्ये विक्रमी १.७ लाख कर्मचारी नियुक्त केले होते. २०२० मध्ये ही संख्या फक्त ३१,००० होती, असे कंपन्यांनी एका निवेदनात म्हटले आहे. महामारीच्या काळात देश डिजिटल मोडकडे वळत असल्याने नोकर भरतीत मोठी वाढ झाली आहे. शिवाय, या कंपन्यांनी भरती वाढवण्यामागे अट्रिशनच्या वाढत्या संख्येचाही मोठा हातभार आहे. त्यामुळं तरुणांना आता ही नोकरीची नामी संधी आहे.

    विप्रो FY23 मध्ये सुमारे ३०,००० फ्रेशर्सची भरती करण्याची योजना आहे. भरती मोहिमेबद्दल बोलताना, कंपनीने सांगितले की, मजबूत मागणीचे वातावरण व्यवस्थापित करण्यात पुरवठा अडथळा होणार नाही याची खात्री करण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. बुधवारी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने देखील सांगितले की कंपनी आपली आक्रमक भरती मोहीम सुरू ठेवेल. विशेष म्हणजे, TCS ने अलीकडेच तब्बल २ लाख कर्मचाऱ्यांचा टप्पा गाठला आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की TCS ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. यापूर्वी टीसीएसने मार्चपर्यंत ३४,००० फ्रेशर्सची नियुक्ती करणार असल्याचे जाहीर केले होते, परंतु ते लक्ष्य आधीच पूर्ण झाले आहे.

    देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी Infosys ने बुधवारी सांगितले की ते चालू आर्थिक वर्षात ५५,००० पेक्षा जास्त फ्रेशर्सची भरती करण्याची योजना करत आहे. डिसेंबर २०२१ ला संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना कंपनीने ही घोषणा केली. “आम्ही प्रतिभा संपादन आणि विकासातील गुंतवणुकीला प्राधान्य देत आहोत आणि आमच्या वाढीच्या महत्त्वाकांक्षेला पाठिंबा देण्यासाठी आमचा जागतिक पदवीधर भरती कार्यक्रम चालू आर्थिक वर्षासाठी ५५,००० पेक्षा जास्त लोकांची भरती केली आहे.” त्यामुळं नवीन वर्षात तरुणांना नोकरीची संधी आहे.