नवीन वर्षात मुंबईत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता, पोलिस प्रशासन सतर्क

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत खालिस्तानी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने हायअलर्ट जारी केला आहे. पोलिसांनी मुंबई शहरातील रेल्वे स्थानक आणि सार्वजनिक ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. पोलिसांच्या साप्ताहिक सुट्या रद्द करण्यात आल्या असून, त्यांना तातडीने ड्युटीवर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  मुंबई : २०२१ या वर्षाला बाय-बाय करत सर्वजण नतून म्हणजे २०२२ वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. जगात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सारेजण सज्ज झाले असताना, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत खालिस्तानी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने हायअलर्ट जारी केला आहे. पोलिसांनी मुंबई शहरातील रेल्वे स्थानक आणि सार्वजनिक ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. पोलिसांच्या साप्ताहिक सुट्या रद्द करण्यात आल्या असून, त्यांना तातडीने ड्युटीवर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीतही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच पोलिसांना नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन सुद्धा केले आहे.

  नवीन वर्षात हल्ला?

  सर्वजण नवीन वर्षाच्या स्वागतात मग्न असताना, मुंबई तसेच अन्य महत्त्वाच्या शहरांवर दहशतवादी हल्ला करायचा असा, नियोजत कट दहशतवाद्यांनी केला आहे, अशी माहिती मिळाली आहे. खलिस्तान समर्थक गटांनी आखलेल्या दहशतवादी कारवायांची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यानंतर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, लुधियाना न्यायालयातील बॉम्बस्फोटांशी कथित संबंध असलेल्या शीख फॉर जस्टिस संघटनेचा (SFJ) सदस्य जसविंदर सिंग मुलतानीला ताब्यात घेतल्यानंतर आणि जर्मनीत चौकशी केल्यानंतर, मुंबई, दिल्ली  आणि इतर मोठ्या शहरांमध्ये नियोजित दहशतवादी हल्ल्यांची माहिती मिळाली होती. तसेच आता सुद्धा गुप्तचर विभागाला माहिती मिळाली असून, पोलीस तसेच प्रशासन सतर्क झाले आहे.

  प्रमुख शहरांत वाढवली सुरक्षा यंत्रणा

  देशातील प्रमुख शहरांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले असल्याची माहीती पुढे येत आहे, दरम्यान दिल्ली तसेच मुंबईवर खालिस्तानी दहशतवाद्यांकडून हल्ल्याची शक्यता आहे. या अलर्टच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून (DDMA) जारी केलेल्या कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक तत्त्वांची देखील काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. नियम न पाळणाऱ्यांवर पोलिस कठोर कारवाई करणार आहेत. पोलिसांकडून रात्रीच्या कर्फ्यूची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या कॅनॉट प्लेस, चाणक्यपुरी, हौज खास आणि इतर भागात तसेच मुंबईतील विविध भागात बंदोबस्त आणि पोलीस अधिक तैनात करण्यात आले आहे. तसेच देशातील मुख्य शहरात पोलीस आणि प्रशासन यंत्रणा अधिक तैनात करण्यात आली आहे.

  तळीरामांवर होणार कारवाई

  ३१ डिसेंबरच्या रात्री तळीरामांची पार्टी करण्यासाठी मोठी गर्दी असते, त्यामुळं मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक पथके तैनात करण्यात आली आहे. रोडरोमिओंवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.