केंद्रीय जोर लावूनही ठाकरे सरकार पडत नाही, सामनातून विरोधकांवर टीका

‘ईडी’मुळे कोणाच्या तोंडास फेस येतोय की काय ते नंतर पाहू,  पण महाराष्ट्राचे ठाकरे सरकार ‘केंद्रीय’ जोर लावूनही पडत नाही म्हणून येथील विरोधी पक्षाच्या तोंडास आलेला फेस स्पष्ट दिसत आहे. म्हणून येथील विरोधी पक्षाच्या तोंडास आलेला फेस स्पष्ट दिसत आहे. असं सामनातून म्हटलं आहे.

  मुंबई : भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले. हसन मुश्रीफ यांनीही पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांचे आरोप फेटाळून लावत उलट त्यांच्यावरच मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचं सांगितलं.

  दरम्यान या सगळ्यात आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत मुश्रीफांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. कोल्हापूरचा पहेलवान गडी कुणाला ऐकणार नाही, असं म्हणत त्यांनी मुश्रीफांची ताकद सोमय्यांना दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी एकाचवेळी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे, सोमय्यांची खिल्ली उडवलीय तर मुश्रीफांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे.

  ‘ईडी’शी लढताना तोंडाला फेस येईल, अशी धमकी चंद्रकांत पाटलांनी मुश्रीफांना दिली. त्यांच्या याच धमकीला राऊतांनी तितक्याच मिश्किलपणे उत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून पळ काढून कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली. कोथरुडला विजय मिळविताना पाटलांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता, असा टोला राऊतांनी लगावला.

  पहेलवान गडी मुश्रीफ तर कुणाला ऐकणार नाही

  भाजपचे माजी खासदार सोमय्या यांचे आरोप व बाता या नागपूरच्या गोटमारीसारख्याच आहेत. ज्यांच्यावर आरोप केले जात आहेत त्यातील अनेकांनी त्यांना कोर्टात खेचले आहे. कोल्हापूरचा पहेलवान गडी मुश्रीफ तर कुणाला ऐकणार नाही, अशा शब्दात त्यांनी सोमय्यांवर टीका केली आहे तर मुश्रीफांचं कौतुक केलं आहे.

  “सोमय्या कोल्हापुरात पोहोचले असते तर कोल्हापूरकरांच्या दैवतांवरही त्यांनी आरोप केले असते. ते उठता बसता, जागेपणी, झोपेतही आरोप करतात. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था व पोलिसांवर ताण वाढतो. मुंबईत दहशतवाद्यांचे नेटवर्क पकडण्यात आले आहे. मुंबई लोकलमध्ये विषारी वायू सोडण्याचा अतिरेक्यांचा कट होता. पोलीस त्या तपासात गुंतले असतानाच विरोधी पक्ष राज्यात भलतेच प्रश्न निर्माण करून पोलिसांवरील ताण वाढवीत आहे. विरोधकांनी निर्माण केलेल्या दुर्गंधीमुळेही जनजीवन विस्कळीत होऊ शकेल. विरोधकांना राज्यातील जनतेच्या जिवाशी खेळायचे आहे काय? एकदा तसे जाहीर करा म्हणजे झाले. असं संजय राऊत म्हणाले.

  ठाकरे सरकार ‘केंद्रीय’ जोर लावूनही पडत नाही

  ऊठसूट ‘ईडी’, ‘सीबीआय’च्या धमक्या का देता? केंद्रीय तपास यंत्रणांचा हा दुरुपयोग नाही, तर काय? महाराष्ट्रातील मंत्र्यांवर, सरकारवर आरोप करणाऱ्याला केंद्र सरकार लगेच ‘झेड’ दर्जाची केंद्रीय सुरक्षा पुरवून स्वतःचेच हसे करून घेते. सत्य असे आहे की, ‘ईडी’मुळे कोणाच्या तोंडास फेस येतोय की काय ते नंतर पाहू,  पण महाराष्ट्राचे ठाकरे सरकार ‘केंद्रीय’ जोर लावूनही पडत नाही म्हणून येथील विरोधी पक्षाच्या तोंडास आलेला फेस स्पष्ट दिसत आहे. म्हणून येथील विरोधी पक्षाच्या तोंडास आलेला फेस स्पष्ट दिसत आहे. असंही सामनातून म्हटलं आहे.