ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळेपर्यंत भाजपा स्वस्थ बसणार नाही ; राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनातून भाजपाचा राज्य सरकारला इशारा

मुंबईत मुलुंड चेक नाका येथे भाजप आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी चक्का जाम करून वाहतूक आडविण्याचा प्रयत्न करणा-या भाजप कार्यकर्ते नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये  आमदार मिहीर कोटेचापालि का गटनेते भालचंद्र शिरसाट, निल सोमय्या, रजनी केणी, जागृती पाटील आणि शेकडे कार्यकर्ते सहभागी झाले होते.  ओबीसींचे पूर्वीचे आरक्षण परत दिले नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी आशिष शेलार यांनी दिला आहे.

  मुंबई : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण परत मिळावे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी तर्फे शनिवारी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहिर, भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशिष शेलार, ओबिसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्यासह पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्यात एक हजारांहून अधिक ठिकाणी हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती प्रदेश भाजप कार्यालयातून देण्यात आली.

  पोलिसांनी आंदोलनकर्त्या नेत्यांना ताब्यात घेतले

  इतर मागासवर्गीयांच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेत राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. पुणे,मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वांच्या शहरात, तर तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावे, यासाठी भाजपने एल्गार केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या नेत्यांना ताब्यात घेतले तसेच कार्यकर्त्यांचीही धरपकड केली.

  आरक्षण रद्द होणे हे राजकीय षड्यंत्र

  नागपूर येथील आंदोलनात सहभागी झालेले माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होणे हे राजकीय षड्यंत्र आहे. आघाडी सरकारने वेळेत कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली असती तर हे आरक्षण रद्द झाले नसते. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्याची या सरकारची इच्छाच नाही असे वाटते आहे.

  आरक्षण परत मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही

  कोल्हापूर येथे आंदोलनात सहभागी झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळेपर्यंत भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही. ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्याने राज्यभरात सामाजिक तणाव निर्माण झाला आहे. आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच हे आरक्षण गमाविण्याची वेळ आली आहे.

  आरक्षण परत मिळेपर्यंत निवडणुका नाही

  राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे पुणे येथे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पंकजा मुंडे यांनी सांगितले की, सत्ताधारी पक्षातील काही मंडळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी राज्य सरकारने विरोधी पक्षांच्या सहकार्याने तातडीने हालचाली करायला हव्यात.

  विविध ठिकाणी चक्का जाम

  यावेळी भाजपच्या हजार ठिकाणच्या कार्यकर्त्यानी संघर्ष आंदोलनात भाग घेतला आणि स्वत:ला अटक करून घेतली. त्यामध्ये खा. डॉ. प्रीतम मुंडे या परळी येथे, प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे, प्रदेश उपाध्यक्ष खा. डॉ. भारती पवार या नाशिक येथे, खा. डॉ. भागवत कराड, आ. अतुल सावे हे संभाजीनगर येथे, आ.गोपीचंद पडळकर हे सांगली येथे आंदोलनात सहभागी झाले होते.

  आंदोलकांना ताब्यात घेतले

  मुंबईत मुलुंड चेक नाका येथे भाजप आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी चक्का जाम करून वाहतूक आडविण्याचा प्रयत्न करणा-या भाजप कार्यकर्ते नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये  आमदार मिहीर कोटेचापालि का गटनेते भालचंद्र शिरसाट, निल सोमय्या, रजनी केणी, जागृती पाटील आणि शेकडे कार्यकर्ते सहभागी झाले होते.  ओबीसींचे पूर्वीचे आरक्षण परत दिले नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी आशिष शेलार यांनी दिला आहे.

  मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. ओबीसी आरक्षण हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, अशा घोषणांनी भाजप कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी शेलार आणि महाजन यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. सरकार ओबीसी आरक्षणविरोधी असल्याची टीका त्यांनी केली.

  माळशिरसमध्ये चक्का जाम ओबीसी समाजाला राजकारणातून हद्दपार करण्याचा घाट आघाडी सरकारने घातला असल्याचा गंभीर आरोप करीत आज ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षणरद्द झाल्याच्या निषेधार्थ माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले या ठिकाणी भाजप नेते रणजीतसिंह मोहिते पाटील आणि कार्यकर्त्यानी चक्का जाम केला.

  खासदार प्रितम मुंडे यांनी परळी शहरातील इटके कॉर्नर चौका मध्ये चक्काजाम आंदोलन केले. त्या म्हणाल्या की, या आंदोलनानंतर सरकारचे डोळे उघडले नाही तर आम्हाला पुन्हा सरकारचे डोळे उघडण्यासाठी आंदोलने करावी लागतील.

  सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठा आणि ओबीसी आरक्षण गेले.  राज्य सरकार आपल्या अपयशाचे खापर मोदींवर फोडते आहे अशी टीका मात्र राज्याच्या मंत्रिमंडळात ओबीसी नेत्यांचे महत्व केवळ ताटातल्या चटणीएवढेच आहे का? हा त्यांना सवाल आहे.

  लोणावळ्यात सर्वपक्षीय दोन दिवसीय शिबीर सुरु

  दरम्यान, ओबीसी आरक्षणावर पुढील रणनीती ठरवण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आजपासून लोणावळा या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसांच्या शिबिरामध्ये अनेक विषयांवर चर्चा केली जाणार आहे. या शिबिरात राज्यातील राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि इतर ओबीसी संघटनांमधील सर्व ओबीसी नेते सहभागी होणार आहेत