Three Member Ward Systems

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील गेल्या आठवड्यातील बैठकीत मुंबई वगळता इतर शहरांसाठी तीनचा प्रभाग करण्यात आला. त्यावरून ठाकरे सरकारमध्ये वादंगला सुरवात झाली, तीनऐवजी दोन सदस्यांचा प्रभाग करण्याचा आग्रह काँग्रेसने धरला. त्यानंतर फेरप्रस्तावही ठाकरे यांना पाठवून, दोनचा प्रभाग करण्याबाबत काँग्रेस नेते सांगत राहिले.

  मुंबई :  राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत बदल करण्यावरून प्रदेश काँग्रेसने ठराव करून राज्य सरकारच्या निर्णयाला उघडपणे विरोध केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही याबाबत काही वेगळ्या सूचना करूनही मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे तीन सदस्यांची प्रभाग पद्धत कायम ठेवण्यावर ठाम आहेत.

  तीनही पक्षांच्या मंत्र्यांमध्ये वादावादी

  काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या बाबतच्या कार्यवृत्तांताला अंतिम मंजूरी देण्यापूर्वी तीनही पक्षांच्या मंत्र्यांमध्ये वादावादी झाल्याचे समजते. मात्र, त्यानंतरही सदस्यांच्या प्रभागांचा फेरविचार करून दोन सदस्यांचा प्रभाग करण्याचा काँग्रेसच्या फेरप्रस्तावाला मुख्यमंत्र्यानी काही सुधारणा हव्या असतील तर त्यानंतर करता येतील असे सांगत नकार दिल्याची माहिती मिळाली आहे. येत्या फेब्रुवारीत होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांसाठी त्यामुळे तीन सदस्यांचा प्रभाग राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  युती सरकारच्या काळातील बहुसदस्य पध्दती

  महापालिका निवडणुकांसाठी नगरपरिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपने बहुसदस्यीय प्रभाग पद्धती २०१७ मध्ये पुन्हा लागू केली होती. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ठाकरे यांनीही सहयोगी काँग्रेसचा आग्रह बाजुला ठेवत त्रिसदस्यीय पध्दतीचा निर्णय कायम ठेवल्याने त्यातून काँग्रेसपक्षाला बाजुला ठेवल्याचा संदेश गेल्याचे मानले जात आहे. भाजप सेना सरकारच्या काळात प्रस्थापित दोन्ही काँग्रेसना शह देण्यासाठी जी रचना करण्यात आली तशीच रचना आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी लागू न करता दोन्ही काँग्रेसने दोन सदस्यांच्या प्रभाग रचनेचा आग्रह धरला होता.

  मुख्यमंत्र्यापुढे आमचे काही चालत नाही

  मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील गेल्या आठवड्यातील बैठकीत मुंबई वगळता इतर शहरांसाठी तीनचा प्रभाग करण्यात आला. त्यावरून ठाकरे सरकारमध्ये वादंगला सुरवात झाली, तीनऐवजी दोन सदस्यांचा प्रभाग करण्याचा आग्रह काँग्रेसने धरला. त्यानंतर फेरप्रस्तावही ठाकरे यांना पाठवून, दोनचा प्रभाग करण्याबाबत काँग्रेस नेते सांगत राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही एक दिवस आधी पर्यटन विभागाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यापुढे आमचे काही चालत नाही असे म्हणत मिश्कील प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत काँग्रेसकडून याबाबतच्या प्रस्तावावर वादळी चर्चा झाली तरी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी निर्णयात कोणताही बदल केला नाही अशी माहिती सुत्रांनी दिली.

  मुख्यमंत्र्यांची ठाम कार्यपद्धती

  त्यामुळे मुख्यमंत्र्यांची ठाम कार्यपद्धती या प्रभाग पद्धतीवरून समोर आली तर सरकारमधील वादंगही नव्याने चव्हाट्यावर आले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे काँग्रेसला जुमानत नसल्याचे त्यांच्या कार्यपद्धतीवरून पुन्हा एकदा दिसून आल्याचे बोलले जावू लागले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आता नेमकी काय भुमिका घेतली जाणार याकडे लक्ष लागले आहे.