The friend kept his word, showing greatness of mind; Congress' Rajni Patil thanked BJP

मला आज माझा लहान भाऊ राजीव सातव यांची आठवण येते, भाजपने मनाचा मोठेपणा दाखवला, त्याबद्दल त्यांचे आभार अशा भावना राज्यसभेवर बिनविरोध निवड झालेल्या काँग्रेस नेत्या रजनी पाटील(Congress' Rajni Patil) यांनी भाजपने माघार घेतल्यानंतर भावना व्यक्त केल्या आहेत.

    मुंबई : मला आज माझा लहान भाऊ राजीव सातव यांची आठवण येते, भाजपने मनाचा मोठेपणा दाखवला, त्याबद्दल त्यांचे आभार अशा भावना राज्यसभेवर बिनविरोध निवड झालेल्या काँग्रेस नेत्या रजनी पाटील(Congress’ Rajni Patil) यांनी भाजपने माघार घेतल्यानंतर भावना व्यक्त केल्या आहेत.

    राज्यसभेच्या पोटनिवडणुकीतून भाजपचे संजय उपाध्याय यांनी नामांकन अर्ज मागे घेतल्यान रजनी पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, सगळ्यांनी समजूतदारपणा दाखवला, दिल्लीत मला आशीर्वाद मिळाले. राज्यातून देखील अनेकांनी पुढाकार घेऊन ही मला संधी मिळाली. राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी समजूतदारपणाने भाजपने मनाचा मोठेपणा दाखवला त्यांचे ही आभार मानते, असे रजनी पाटील म्हणाल्या.

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी एखाद्याच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याची परंपरा असल्याची आठवण भाजपला करुन दिली होती. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आपला उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.त्यानुसार काँग्रेसची विनंती भाजपने मान्य केली.

    भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर ही काँग्रेसने उमेदवार दिला नव्हता. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर मलाच उमेदवारी दिली होती, आताही राजीव सातव यांच्या निधनानंतर उमेदवारी दिली आहे. बिनविरोध निवडणुकीचा पायंडा काँग्रेसने जपला, तीच परंपरा पाहायला मिळत आहे, असे रजनी पाटील म्हणाल्या. यावेळी अर्ज बाद होण्याबाबत चंद्रकांत पाटील काय बोलले होते याबद्दल मला काही बोलायचे नाही, असेही त्या म्हणाल्या.

    भाजपने अर्ज मागे घ्यावा ही विनंती आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आम्हाला खात्री आहे की आमच्या विनंतीचा मान ठेवला जाईल, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी फडणवीसांच्या भेटीनंतर दिली होती. तर संघटनेत चर्चा करुन फडणवीस निर्णय घेतील असे त्यांनी सांगितल्याचे पटोलेंनी स्पष्ट केले. चार दिवसांनंतर निवडणुकीतून माघार घेत असल्याचे भाजपने जाहीर करुन काँग्रेसला दिलेला शब्द पाळला आहे.