सरकारने फेरीवाला खाते तयार करावे; सामाजिक कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    मुंबई : सरकारने आतापर्यंत जाहिर केलेल्या फेरीवाला धोरणातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे धोरण न करता केंद्राच्या सूक्ष्म, लघु, मध्यम खात्याच्या धर्तीवर सरकारने फेरीवाला कायदा बनवावा. या कायद्यातंर्गत फेरीवाला खाते तयार करून या खात्याचा फेरीवाला मंत्री तयार करावा, अशी मागणी माजी पोलिस अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते ऍड. विश्वास काश्यप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

    मुंबई, ठाणे यासह महानगर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये फेरीवाला समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. ठाणे महापालिकेच्या महिला सहाय्यक आयुक्त यांच्यावर हल्ला करून त्यांच्या हाताची बोटे छाटण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. फेरीवाल्यांवर पालिकेकडून दिखाऊ कारवाई केली जाते. यासाठी बनवलेले धोरण लाल फितीत अडकवून ठेवत त्यातून लाभ उठवण्याचा पालिका आणि पोलिस यांच्याकडून प्रयत्न होतो आहे, असे ऍड. काश्यप यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

    घटनेनुसार उपजीविकेचा अधिकार सगळ्यांना आहे. तसेच फुटपाथवर चालण्याचा पादचाऱ्यांचाही अधिकार आहे. अधिकृत फेरीवाल्यांना विरोध नाही, पण अनधिकृत फेरीवाल्यांना विरोध हा झालाच पाहिजे. सर्वच रेल्वे स्थानक परिसर, रस्ते आणि फूटपाथ फेरीवाल्यांनी भरून गेल्या आहेत. सामान्य नागरिकांना चालण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे या समस्येवर तातडीने इलाज करायला हवा. नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

    हप्त्यांवर चाप बसायला हवा

    फेरीवाला हा खूप मोठा व्यवसाय आहे. या व्यवसायामध्ये प्रामाणिकपणे व्यवसाय करणारेही आहेत. काही लोक जागा भाड्याने देऊन, काही असामाजिक तत्वांचा वापर करून हा व्यवसाय केला जातो आहे. काही फेरीवाल्यांची एकूणच उलाढाल कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. हे पैसे हप्यांच्या रूपाने राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, गल्लीतील फेरीवाला नेता, पालिका यांच्या खिशात जातात, त्यामुळे फेरीवाला खात्यामार्फत यावर चाप लावता येईल, अशी माहिती ऍड. काश्यप यांनी दिली आहे.