स्वबळाची भाषा करणाऱ्या नेत्यांना हायकमांडने दिली समज; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या दिल्ली वारीत खलबते झाल्यांची सूत्रांची माहिती

राज्यात आगामी निवडणुकांत काँग्रेसच्या स्वबळाच्या ना-याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भुमिका समजावून घेत महाविकास आघाडीत कटूता येणार नाही याची काळजी घेण्याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठीनी तातडीच्या दिल्ली बैठकीत समज दिल्याची माहिती जाणकार सूत्रांनी दिली आहे. या सूत्रांच्या मते भाजपमधील काही नेत्यांची घरवापसी करून निवडणुकांत वर्चस्व वाढविण्याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे प्रस्ताव आला असून त्या अनुषंगाने पटोले यांना अचानक दिल्लीत बोलावून जुन्या नव्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशावर चर्चा झाल्याचेही बोलले जात आहे.

  मुंबई : राज्यात आगामी निवडणुकांत काँग्रेसच्या स्वबळाच्या ना-याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भुमिका समजावून घेत महाविकास आघाडीत कटूता येणार नाही याची काळजी घेण्याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठीनी तातडीच्या दिल्ली बैठकीत समज दिल्याची माहिती जाणकार सूत्रांनी दिली आहे. या सूत्रांच्या मते भाजपमधील काही नेत्यांची घरवापसी करून निवडणुकांत वर्चस्व वाढविण्याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे प्रस्ताव आला असून त्या अनुषंगाने पटोले यांना अचानक दिल्लीत बोलावून जुन्या नव्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशावर चर्चा झाल्याचेही बोलले जात आहे.

  बड्या नेत्यांचे काँग्रेसमध्ये प्रवेश

  भाजपच्या काही आजी-माजी आमदार-खासदारांनी सत्तेत लाभाचे पद हवे असा ‘शब्द’ घेऊन भाजप सोडून पुन्हा घरवापसी करण्याबाबत विचारणा केली आहे. या नेत्यांच्या प्रवेशाकरिता रणनिती ठरविण्यासाठीच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी चर्चा केल्याची माहिती या सूत्रांनी दिली आहे. पुढील महिनाभरात भाजप मधून काही बड्या नेत्यांचे काँग्रेसमध्ये प्रवेश होऊ शकतात असे या सूत्रांनी सांगितले.

  भाजपचे नेते काँग्रेसच्या संपर्कात

  विदर्भात भाजप नेते, माजी मंत्री सुनील देशमुख हे गेल्या आठवड्यात स्वगृही परतले, त्यापाठोपाठ राज्याच्या इतर भागांतील नेतेही काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता आहे. काही आमदार-माजी आमदारांनी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडे पक्षप्रवेशाची मागणी केल्याचे समजते. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, खानदेशातील भाजपचे नेते कॉंग्रेसच्या संपर्कात असल्याचेही सांगण्यात आले. त्या अनुषंगाने पटोले यांना अचानक दिल्लीत बोलावून घेण्यात आले होते, जुन्या नव्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशावर चर्चा झाल्याचेही बोलले जाते.

  विधानसभाध्यक्षांसाठी तीन नावे आघाडीवर

  दिल्लीत काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि त्यासाठीचा उमेदवार यावरही चर्चा झाली आहे. या पदासाठी आमदार संग्राम धोपटे यांच्यासह तीन नावे आघाडीवर आहेत मात्र तीनही पक्षांच्या नेत्याच्या सहमतीने त्यावर पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह कॉंग्रेसमधील अल्पसंख्याक समाजाच्या आमदारांच्या  नावाचा समावेश झाल्याने पेच निर्माण झाला आहे.

  अल्पसंख्याक समाजाच्या आमदाराला संधी?

  या पदासाठी तरुण आणि आक्रमक तसेच सर्वसमावेशक चेहरा असावा, असा आग्रह आहे. त्यामुळे संग्राम थोपटे आणि चव्हाण हे अनुभवी असले तरी त्यांच्या नावावर राष्ट्रवादी पक्षाकडून सहमती मिळण्याबाबत विचार होऊ शकेल किंवा नाही याबाबत चाचपणी केली जात असल्याचे या सूत्रांचे मत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी चर्चा करून मुंबईतील अल्पसंख्याक समाजाच्या आमदाराला या पदावर संधी दिली जाण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.