गड किल्ल्याच्या नावाला साजेशी वागणूक असावी, मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्यांची नावे, यावर खासदार संभाजीराजे यांची प्रतिक्रिया

    नांदेड : मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्यांची नावे देण्याचा निर्णय राज्यातील महाविकस आघाडी सरकारनं घेतला. त्यामुळं आता मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांची नावं गडकिल्ल्यांच्या नावाने ओळखली जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज  यांनी तयार केलेल्या किल्ल्याचं जतन व्हावं आणि किल्ल्याच्या नावांना उजाळा मिळावा यासाठी राज्य सरकारच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारच्या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, मंत्र्यांच्या बंगल्याला गडकोट किल्ल्यांची नावे देण्यात गैर नाही मात्र, गड किल्ल्याच्या नावाप्रमाणे साजेशी वागणूक तिथे असायला हवी, तसेच त्या नावाला नेहमी आदर मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा खासदार संभाजी छत्रपती यांनी व्यक्त केलीय. ते नांदेडमध्ये बोलत होते.

    दरम्यान, राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याचे बदलेले नाव आता शिवगड असणार आहे. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या बंगल्याचे नाव रायगड असेल. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्याचे नाव सिंहगड आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या बंगल्याचे नाव रत्नसिंधू असेल. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्याचे नाव पावनगड तर महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या बंगल्याचे नाव सिद्धगड असेल. तर कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या बंगल्याचे नाव हे राजगड असेल, त्यामुळं आता मंत्र्यांच्या बंगल्यावर जातोय असं म्हणतेवेळी मी रायगडावर चाललोय असं म्हणता येणार आहे.

    मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्यांची नावे देण्यात आली, याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाला गड किल्ल्यांची नावे देण्याची मागणी केली होती. ही मागणी राज्य सरकारपुढे विचाराधीन होती. त्यानुसार सार्वजनिक आणि बांधकाम विभागाला मंत्र्यांच्या आणि राज्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांना गड किल्ल्यांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबतचे पत्रकही जारी करण्यात आले आहे, हे पत्रक आणि आपल्या बंगल्याचे नाव याची माहिती देणारे टिव्ट उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

    पण हा निर्णय योग्य असला तरी, गडकिल्यांच्या नावांना चांगली, साजेशी वागणूक मिळाली पाहिजे असं खासदार संभाजीराजे म्हणालेत.