दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांची नावंही उघड होणार : चंद्रकांत पाटील

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजप काढणार आहे. तसे सुतोवाचच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील, असं मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

    मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजप काढणार आहे. तसे सुतोवाचच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील, असं मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजारणात मोठी खळबळ उडाली आहे.

    चंद्रकांत पाटील नेमक काय म्हणाले?

    अनेकांना असं वाटतं की, घोटाळ्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार सापडत आहेत. दोन काँग्रेसच्याही नेत्यांची नावे आली आहेत. दोन दिवसात त्यांचेही विषय समोर येतील, असं विधान करून पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.

    ते दोन काँग्रेसचे नेते कोण?

    पाटील यांनी काँग्रेसच्या दोन नेत्यांचे घोटाळे बाहेर येणार असल्याचं सूचक विधान केलं आहे. पण ते कोण नेते आहेत ते काही त्यांनी सांगितलं नाही. त्यामुळे अधिकच सस्पेन्स वाढला आहे. ज्या काँग्रेस नेत्यांचे घोटाळे बाहेर येणार आहेत ते राज्यमंत्री आहेत की कॅबिनेट मंत्री? ते आमदार आहेत की नेते आहेत? यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

    मुश्रीफांना कोणतीही ऑफर नव्हती

    चंद्रकातदादांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण मी ती नाकारली. त्यानंतरच माझ्यावर आयकर विभागाच्या धाडी सुरू झाल्या, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. हसन मुश्रीफांना कोणतीही ऑफर नव्हती. एखाद्याला ऑफर दिली आणि त्यांनी ती नाकारली तर ती मेरिटवर नाकारतात. त्यामुळे त्यांना त्रास देण्याचं कल्चर आमचं नाही. मुश्रीफांनी हा सगळा ड्रामा बंद करावा. असंही ते म्हणाले.

    शांत डोक्याने काम करा

    आरोप झाले म्हणून मुश्रीफ यांनी पॅनिक होऊ नये. त्यांनी शांत डोक्याने काम करावं. कायद्याची लढाई कायद्याने लढावी. गुद्द्यावर येऊ नका. कारखान्यातील गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या कोणत्या? या कंपन्या कुठे आहेत? याची माहिती द्या. विषयांतर करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. मुश्रीफांनी आता ड्रामा बंद करावा. ईडीची लवकरच नोटीस निघणार आहे, त्यासाठी एखादा चांगला वकील बघावा, असंही ते म्हणाले.