विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तर भाविकांना देवतांच्या दर्शनाला जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होणार

कोरोना कोविड-१९च्या संसर्गामुळे राज्यात निर्बंध लागू झाल्याने बंद झालेल्या शाळा ४ ऑक्टोबरपासून, तर धार्मिक स्थळे ७ ऑक्टोबरपासून खुली होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तर भाविकांना देवतांच्या दर्शनाला जाण्यासाठी एसटी महामंडळाने पूर्ण क्षमतेने बसगाड्या पूर्ण फेऱ्या रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

    मुंबई : कोरोना कोविड-१९च्या संसर्गामुळे राज्यात निर्बंध लागू झाल्याने बंद झालेल्या शाळा ४ ऑक्टोबरपासून, तर धार्मिक स्थळे ७ ऑक्टोबरपासून खुली होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तर भाविकांना देवतांच्या दर्शनाला जाण्यासाठी एसटी महामंडळाने पूर्ण क्षमतेने बसगाड्या पूर्ण फेऱ्या रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजन करण्याचे आदेश एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना दिले आहेत.

    विभाग नियंत्रकांसह सर्व अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश

    राज्य सरकारने शाळा, धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे एसटीच्या वाहतुकीला चालना मिळणार आहे. या अपेक्षेने एसटीला पुन्हा पूर्वीसारख्या प्रवासी फे-या करता येणार आहेत. त्यासाठी महामंडळाने सज्जता सुरू करण्याचे आदेश दिले असून विभाग नियंत्रकांसह सर्व अधिकाऱ्यांना मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. विभाग नियंत्रकांना कार्यशाळेस भेट देऊन यंत्र अभियंता, उपयंत्र अभियंता, सहायक यंत्र अभियंता, विभागीय भांडार अधिकारी विभागीय लेखा अधिकारी आणि सर्व भांडार व यांत्रिकी पर्यवेक्षकांची बैठक घेऊन तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.