पतीच्या मृत्यूचा धक्का सहनच झाला नाही; पत्नीची मुलासह १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

अंधेरी पूर्व येथे राहणाऱ्या एका ४४ वर्षीय महिलेने सात वर्षांच्या मुलासोबत आत्महत्या करुन जीवन संपवले. तिने मुलाला घेऊन इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारली. सोमवारी ही धक्कादायक घटना घडली. आत्महत्या करण्यापूर्वी महिलेने ३० मे रोजी फेसबुकवर पोस्ट अपलोड केली होती, त्यात कोविडमुळे त्यांच्या पतीचा अचानक मृत्यू झाल्यामुळे परिस्थिती खालवल्याबाबत लिहिले होते.

    मुंबई : अंधेरी पूर्व येथे राहणाऱ्या एका ४४ वर्षीय महिलेने सात वर्षांच्या मुलासोबत आत्महत्या करुन जीवन संपवले. तिने मुलाला घेऊन इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारली. सोमवारी ही धक्कादायक घटना घडली. आत्महत्या करण्यापूर्वी महिलेने ३० मे रोजी फेसबुकवर पोस्ट अपलोड केली होती, त्यात कोविडमुळे त्यांच्या पतीचा अचानक मृत्यू झाल्यामुळे परिस्थिती खालवल्याबाबत लिहिले होते.

    चांदिवली येथील नहर अमृत रोडवरील तुलिपिया इमारतीत हा प्रकार घडला. रेश्मा त्रेंचिल (४४) असे मृत महिलेचे नाव असून त्यांच्यासोबत गरूड (७) या त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला. त्यांचे मुंबईत कोणीही नातेवाईक नसून त्यांचा भाऊ अमेरीकेतून येणार आहे. त्यानंतर मृतदेह कुटुबिंयांना सुपूर्द करण्यात येतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शरद मुलूकुट्ला (४९) असे रेश्मा यांच्या पतीचे नाव होते. ते ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफोर्वर अॅग्रीकल्चरल कमोडिटी विभागात प्रमुख म्हणून काम करत होते. रेश्मा या गृहिणी होत्या.

    त्यांच्या पतीचे आई-वडील वाराणसीमध्ये राहतात. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार मिळावे म्हणून शरद हे वारणसीला गेले होते. पण दुर्दैवाने त्यांनाही कोविड झाला. चार आठवडे कोविडशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यांचा मृत्यू झाला होता. पतीच्या मृत्यूनंतर रेश्मा यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. त्यात पतीच्या अचानक झालेल्या निधनामुळे जीवन कसे बदलले आहे. हे त्यांनी मांडले. जीवनात कशा अडचणी आल्या आहेत, याबाबत त्यांनी लिहीले होते. त्यानंतर ही घटना घडल्यामुळे त्यांनी याच कारणामुळे आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान रेश्मा यांच्या घरी अद्याप कोणतीही सुसाईड नोंट सापडलेली नाही. याप्रकरणी साकीनाका पोलिस अधिक तपास करत आहेत.