मंत्रालयासमोर आत्महत्येच्या प्रयत्नाचे सत्र थांबेना; सदनिकाधारकांच्या न्यायासाठी साताऱ्याच्या प्रकाश पाटील यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

गेल्या ऑगस्ट महिन्यात २ व्यक्तींनी मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. १५ ऑगस्टला मुख्यमंत्री मंत्रालयातील ध्वजारोहण करून बाहेर पडल्यानंतर मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुनील गुजर असे या शेतकऱ्याचे नाव होते.

    मुंबई : मंत्रिमंडळ बैठकीचा दिवस म्हणजे मंत्रालय परिसरात हमखास अप्रिय घटना असे समीकरणच गेल्या काही दिवसांत दिसू लागले आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात २ व्यक्तींनी मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. १५ ऑगस्टला मुख्यमंत्री मंत्रालयातील ध्वजारोहण करून बाहेर पडल्यानंतर मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुनील गुजर असे या शेतकऱ्याचे नाव होते. तसेच २० ऑगस्टला गावातील घर आणि जमीन बळकाविल्याच्या वादातून पुण्यातील आंबेगाव येथील व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मंगळवारी पुन्हा एकदा सदनिका धारकांना न्याय मिळत नाही म्हणून साता-याच्या प्रकाश शंकर पाटील या ४४ वर्षीय नागरिकाने डिझेल अंगावर टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची अप्रिय घटना घडली आहे.

    वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला

    मंगळवारी सायंकाळी उशीरा अंगावर डिझेल ओतून प्रकाश पाटील (४४)  या व्यक्तीने मंत्रालयासमोर मादाम कामा रस्त्यावर आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबत सुरक्षा रक्षक पोलीसांनी वेळीच त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. त्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश शंकर पाटील, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मंत्रालयासमोर डिझेल घेऊन पोहोचले. त्यांनी डिझेल अंगावर ओतून स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी मंत्रालयाच्या सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून त्यांना रोखले.

    २० हजाराच्या जामीनावर मुक्तता

    सातारा जिल्हाधिका-यांकडून त्यांच्या विरोधात सुरू असलेली विभागीय चौकशी ४ महिन्यांपूर्वीच संपलेली आहे. मात्र, अद्यापही सदनिकांबाबतचा अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे ४६ सदनिका धारकांना न्याय मिळत नसल्याने या व्यक्तीने टोकाचे पाऊस उचलल्याचे त्यांनी पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी मरीनड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून प्रकाश पाटील यांना २० हजाराच्या जामीनावर मुक्त करण्यात आले आहे.