सत्य लवकरच बाहेर येणार?, परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बची चौकशी करा; याचिकेवर ३० मार्चला सुनावणी

गृहमंत्री देशमुख यांनी बारमालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये वसुली करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून केल्यावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची खंडपीठाने दखल घेतली आणि याचिकेवर ३० मार्चला सुनावणी निश्चित केली.

    गृहमंत्री देशमुख यांनी बारमालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये वसुली करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून केल्यावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या कथित दरमहा शंभर कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल केली आहे.

    मात्र, राजकीय दबावापोटी पोलीस कारवाई करीत नाहीत. त्यामुळे सीबीआय, ईडी किंवा अन्य स्वतंत्र तपास यंत्रणेद्वारे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याची मागणी कऱणारी फौजदारी रीट याचिका पाटील यांनी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. त्याची दखल घेत खंडपीठाने याचिकेवर ३० मार्च रोजी सुनावणी निश्चित केली.