‘…तर पराक्रमाची व्याख्या तपासावी लागेल’ सामनातून भाजपला पराक्रमाची शिकवण

प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर राज्या-राज्यांच्या चित्ररथांचे संचलन नेहमीच होत असते. आपापल्या राज्याच्या सांस्कृतिक, सामाजिक वैशिष्टय़ांसह हे चित्ररथ सजविले जातात. देशाच्या विविधतेत असलेल्या एकतेचे दर्शन या निमित्ताने घडते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पराक्रमावर आधारित चित्ररथ पश्चिम बंगालने तयार केला, पण केंद्र सरकारने तो नाकारला. येथेच वादाची ठिणगी पडली आहे.

    देशाला पराक्रमाची गरज आहे, पण दुसऱ्याचा पराक्रम स्वतःच्या नावावर खपविण्यात पराक्रम नाही. पाकिस्तानची फाळणी घडवून इंदिरा गांधींनी ‘फाळणी’चा सूड घेतला व पराक्रम केला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या परक्रमावरील पश्चिम बंगालचा चित्ररथ डावलणे यास कोणी पराक्रम मानत असेल तर शौर्य, पराक्रमाची व्याख्या तपासावी लागेल. नेताजींना राजकीय वादात ओढून कोणाचा काय फायदा होणार? असं शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपला इतिहासाचे धडे देण्यात आले आहेत.

    काय म्हटलंय सामनात?

    देशात मोदीकृत भाजपचे राज्य आल्यापासून सगळेच विषय नव्या स्वरूपात समोर येत आहेत. चीनसारखी राष्ट्रे हिंदुस्थानचा भूगोल बदलू पाहत आहेत, पण नवे सरकार पुस्तकांतील इतिहास बदलत आहे. राष्ट्रीयत्व, राष्ट्रपुरुषांच्या व्याख्याही बदलल्या जात आहेत व त्यावरून रोज नवे वाद आणि झगडे सुरू झाले आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या चित्ररथावरून केंद्र विरुद्ध पश्चिम बंगाल सरकार अशा वादास तोंड फुटले आहे.

    प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर राज्या-राज्यांच्या चित्ररथांचे संचलन नेहमीच होत असते. आपापल्या राज्याच्या सांस्कृतिक, सामाजिक वैशिष्टय़ांसह हे चित्ररथ सजविले जातात. देशाच्या विविधतेत असलेल्या एकतेचे दर्शन या निमित्ताने घडते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पराक्रमावर आधारित चित्ररथ पश्चिम बंगालने तयार केला, पण केंद्र सरकारने तो नाकारला. येथेच वादाची ठिणगी पडली आहे.

    नेताजी बोस यांचे शौर्य, राष्ट्रभक्ती व त्याग परमोच्च आहे. महाराष्ट्रास जसा शिवरायांच्या शौर्याचा, महान क्रांतिकारकांच्या बलिदानाचा इतिहास आहे, त्याचप्रमाणे पश्चिम बंगालनेही सामाजिक, राजकीय क्रांतीची तुतारी फुंकली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस हे तर बंगाली जनतेचे पंचप्राण आहेत. त्यामुळे अनेकदा राजकीय सभा-संमेलनांतही नेताजींच्या शौर्याचा गजर केला जातो. कालच्या विधानसभा निवडणुकीत भाजप पुढाऱयांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावानेच मते मागितली.

    पंतप्रधान मोदी असतील किंवा गृहमंत्री अमित शहा यांनी फक्त नेताजींच्या शौर्याचीच भाषणे केली. काँग्रेसने नेताजींना कसे डावलले, महात्मा गांधी-नेहरूंनी नेताजींवर कसा अन्याय केला याचेच पाढे जाहीर सभांतून वाचत राहिले. तरीही बंगाली जनतेने भाजपचा पराभव केला. भाजपवाल्यांचे नेताजींवर इतकेच प्रेम उतू जात होते, मग पश्चिम बंगालने तयार केलेला नेताजींच्या शौर्याचा चित्ररथ का डावलला हा प्रश्न निर्माण होतो.

    देशाला पराक्रमाची गरज आहे, पण दुसऱ्याचा पराक्रम स्वतःच्या नावावर खपविण्यात पराक्रम नाही. पाकिस्तानची फाळणी घडवून इंदिरा गांधींनी ‘फाळणी’चा सूड घेतला व पराक्रम केला. पाकिस्तान तोडले हा दिवस सुद्धा पराक्रमाचाच दिवस आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या परक्रमावरील पश्चिम बंगालचा चित्ररथ डावलणे यास कोणी पराक्रम मानत असेल तर शौर्य, पराक्रमाची व्याख्या तपासावी लागेल. नेताजींना राजकीय वादात ओढून कोणाचा काय फायदा होणार? पश्चिम बंगालच्या निवडणुकीत त्याचे प्रदर्शन घडले आहे!