‘हे दिवस बदलतील, दुर्दम्य आशावाद घेऊन प्रियंका-राहुल उभे आहेत’ संजय राऊत यांनी सांगीतलं ‘गांधी’ भेटीत नेमकं काय घडलं

राहुल गांधी यांना मंगळवारी तर सध्या उत्तर प्रदेशात जागोजागी मोठी गर्दी जमत असलेल्या त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांना बुधवारी 10, जनपथ या सोनिया गांधींच्या निवासस्थानी भेटलो. ‘‘तुम्ही सध्या इथेच राहता?’’ यावर प्रियंका म्हणाल्या, ‘‘सध्याच्या मोदी सरकारने मला घरातून बाहेर काढल्यापासून मी खान मार्केटजवळच्या एका इमारतीत राहते, पण लोकांना तेथे भेटता येत नाही. त्यामुळे येथे येऊन भेटीगाठी घेते.’’ सर्वत्र एक प्रकारची भीती सध्या निर्माण करण्यात येत आहे. ही भीती ED, CBI, इन्कम टॅक्स यंत्रणांची आहे. महाराष्ट्र आणि बंगालमध्ये या यंत्रणा भाजपसाठी काम करतात. प्रियंका गांधी जे म्हणाल्या ते महत्त्वाचे. ‘‘महाराष्ट्र, बंगाल काय घेऊन बसलात? मी व माझे कुटुंबही त्याच चक्रातून जात आहोत. मी लखीमपूर खिरीला जाताच माझ्या पतीला एका दिवसात 69 नोटिसा आल्या इन्कम टॅक्सच्या, पण मी मागे हटणार नाही. लढत राहीन.’’ प्रियंका यांच्या वागण्या-बोलण्यात सकारात्मक आक्रमकता व इंदिरा गांधींचे तेज आहे.

    २०२४ च्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. उत्तर प्रदेश, पंजाबसह ५ राज्यांतील विधानसभा निवडणुका आधी होतील. ती म्हणजे २०२४ ची रंगीत तालीम असेल. ममता बॅनर्जी नव्या विरोधी आघाडीचा ‘घोडा’ देशभरात फिरवीत आहेत. अशा वेळी काँग्रेस कोठे आहे? दिल्लीत राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्याशी भेटून संजय राऊत यांचे काय बोलणे झाले त्याचा गोषवारा राऊत यांनी आजच्या रोखठोकमध्ये दिला आहे.

    काय म्हटलंय संजय राऊत यांनी?

    काँग्रेसचे माजी अध्यक्ष व आजच्या काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांना दिल्लीतील त्यांच्या तुघलक लेन या निवासस्थानी भेटलो. गांधी यांच्या नेतृत्वाविषयी आज सगळ्यात जास्त भ्रम आणि संशय निर्माण केला जात आहे. देशातील विरोधी पक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली एकवटायला तयार नाही. त्यामुळे मोदी व त्यांच्या पक्षाला रान मोकळे आहे, असे चित्र निर्माण केले जात आहे. ते तितकेसे खरे नाही.

    ममता बॅनर्जी यांनी ‘यूपीए’च्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. विरोधी पक्षांच्या आघाडीचा नवा घोडा घेऊन प. बंगालच्या मुख्यमंत्री २०२४ मध्ये मैदानात उतरत आहेत. त्यांना काँग्रेसशिवाय नवी आघाडी हवी आहे. मंगळवारच्या भेटीत राहुल गांधी यांच्याशी या विषयावर चर्चा झाली. ‘‘ममता बॅनर्जींच्या मनात नेमके काय आहे? त्यांना काय हवे आहे?’’ हा प्रश्न त्यांच्याही मनात होताच.

    राहुल गांधी यांना मंगळवारी तर सध्या उत्तर प्रदेशात जागोजागी मोठी गर्दी जमत असलेल्या त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांना बुधवारी 10, जनपथ या सोनिया गांधींच्या निवासस्थानी भेटलो. ‘‘तुम्ही सध्या इथेच राहता?’’ यावर प्रियंका म्हणाल्या, ‘‘सध्याच्या मोदी सरकारने मला घरातून बाहेर काढल्यापासून मी खान मार्केटजवळच्या एका इमारतीत राहते, पण लोकांना तेथे भेटता येत नाही. त्यामुळे येथे येऊन भेटीगाठी घेते.’’

    इंदिरा गांधींची नात, पंडित नेहरूंची पणती, राजीव गांधींची कन्या मला हे सर्व सांगत होती. तेव्हा राज्यकर्त्यांच्या मानसिकतेची दया आली. जिची आजी आणि पिता अतिरेक्यांच्या हल्ल्यात मारले गेले त्या कन्येस सुरक्षेच्या कारणास्तव एक सरकारी घर भाजप सरकार देऊ शकले नाही. उलट राहत्या घरातून बाहेर काढले. आज दिल्लीत अनेक सरकारी घरे ‘गेस्ट अकॉमोडेशन’च्या नावाखाली कोणी व कोणत्या संघटनांच्या लोकांनी बळकावली आहेत हे पाहिल्यावर प्रियंका गांधींची वेदना लक्षात येईल.

    सर्वत्र एक प्रकारची भीती सध्या निर्माण करण्यात येत आहे. ही भीती ED, CBI, इन्कम टॅक्स यंत्रणांची आहे. महाराष्ट्र आणि बंगालमध्ये या यंत्रणा भाजपसाठी काम करतात. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना चौकशीच्या फेऱ्यात गुंतवून ठेवले जाते. भाजपविरोधात जे बोलतील ते शत्रू अशा पद्धतीचे वर्तन चालले आहे.

    यावर प्रियंका गांधी जे म्हणाल्या ते महत्त्वाचे. ‘‘महाराष्ट्र, बंगाल काय घेऊन बसलात? मी व माझे कुटुंबही त्याच चक्रातून जात आहोत. मी लखीमपूर खिरीला जाताच माझ्या पतीला एका दिवसात 69 नोटिसा आल्या इन्कम टॅक्सच्या, पण मी मागे हटणार नाही. लढत राहीन.’’ प्रियंका यांच्या वागण्या-बोलण्यात सकारात्मक आक्रमकता व इंदिरा गांधींचे तेज आहे.

    ‘‘लोक म्हणतात मी इंदिराजींसारखी थोडी रागीट आहे, पण अन्यायाविरुद्ध थोडा संताप हा हवाच!’’ असे प्रियंका म्हणाल्या. ‘‘इंदिराजींचे व्यक्तिमत्त्व विलोभनीय होते. त्यांच्याविषयी कमालीचा आदर व प्रेम लोकांत होते. आणीबाणीनंतर लोक त्यांच्यावर रागावले, पण त्याच लोकांनी दोन वर्षांनी पुन्हा इंदिराजींना निवडून दिले. प्रेमाचा वर्षाव केला. तुम्हालासुद्धा उत्तर प्रदेशात आता तेच प्रेम मिळताना आम्ही पाहतोय,’’ असे मी म्हणालो.

    प्रियंका शांतपणे त्यावर म्हणाल्या, ‘‘मी पक्ष पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न करतेय. आव्हान आहे. जिल्हा स्तरावर काम करणाऱ्या आमच्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. तरीही मी तेथे ठामपणे उभी आहे!’’ प्रियंका व राहुल गांधी यांच्यात कमालीची एकवाक्यता आहे. राजकीय चर्चेत प्रियंकांकडून एखाद्या भूमिकेची लगेच अपेक्षा करावी तर ही छोटी प्रियदर्शनी शांतपणे सांगते, ‘‘इस पर भैया से बात करनी पडेगी. भैया को पूंछना होगा.’’ दिल्लीपासून गोवा आणि उत्तर प्रदेशपर्यंत अनेक विषयांवर चर्चा झाली. हे दिवस बदलतील हा दुर्दम्य आशावाद घेऊन प्रियंका उभ्या आहेत.