‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रजनी पाटील यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज विधिमंडळात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीकडे पूर्ण बहुमत असल्याने रजनीताई पाटील या बहुमताने निवडून येतील, असा विश्वास मविआच्या नेत्यांनी व्यक्त केला.

    राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे निधन झाल्यानंतर आता राज्यसभेच्या या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे नेते, मंत्री एकनाथ शिंदे व काँग्रेसचे नेते मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

    यावेळी माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, “आत्तापर्यंतची महाराष्ट्राची परंपरा अशी आहे की जेव्हा निधनासारखी दुर्दैवा घटना घडते, तेव्हा आपण निवडणुकीत एकमेकांना सहकार्य करून बिनविरोध निवडणूक करतो. पण मला खात्री आहे की विरोधी पक्ष म्हणून त्यांची काही भूमिका असली, तरी ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील आणि निवडणूक बिनविरोध करतील. यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत.”

    देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करणार

    निवडणूक बिनविरोध होण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं. “अशा विषयांमध्ये आपण भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, त्यानुसार आम्ही (फडणवीसांची) भेट घेऊ”, असं थोरात यावेळी म्हणाले.

    दरम्यान, सोमवारी सकाळी भाजपने राज्यसभेच्या एका जागेची निवडणूक लढण्याची घोषणा केली. भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय असतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय हे आज, २२ तारखेला सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज विधानभवनात दाखल केला.