दबावाला बळी न पडणाऱ्यांना नोटीसा, संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, शिवसेना स्टाईलनं देणार प्रत्युत्तर

केंद्र सरकारच्या दबावाला जे बळी पडत नाहीत, त्यांना नोटीसा पाठवल्या जात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केलाय. संजय राऊत यांच्या पत्नीच्या नावे ईडीनं नोटीस पाठवल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी हे आरोप केलेत.

ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली असली, तरी केंद्र सरकारच्या दबावापुढे आम्ही झुकणार नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. शिवसेना कधीच दबावाला बळी पडत नसल्याचं सांगत अशा प्रकारांना शिवसेना स्टाईलनं प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारादेखील राऊत यांनी दिला.

केंद्र सरकारमधील सत्ताधारी पक्षाला जेव्हा इतर पक्षांना संपवण्यात यश येताना दिसत नाही, तेव्हा सीबीआय आणि ईडीसारखी हत्यारं वापरली जातात. शरद पवार, प्रफुल्ल पटेल, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईक यांच्यासारख्या नेत्यांनाही सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. दबावाला नेते जेव्हा बळी पडत नाहीत, तेव्हा हतबल होऊन त्यांना असे कागदाचे तुकडे पाठवले जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचे सर्व तऱ्हेचे प्रयत्न करून थकलेल्या भाजपचा हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मात्र बाहेरून तुम्ही कुठलेही गु्ंड किंवा दहशतवादी घेऊन आलात, तरी आम्ही झुकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

घरातील मुलांवर आणि महिलांवर हल्ले करण्याला नामर्दानगी म्हणतात. अशी नामर्दानगी करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल आणि शिवसेना स्टाईलनं उत्तर दिलं जाईल, असा इशारा त्यांनी दिला. आम्ही कुणालाही घाबरत नसल्याचं ते म्हणाले.