narendra patil

कोल्हापूरनंतर आता सोलापुरात हा मोर्चा निघणार आहे. केवळ मराठा समाजच नाही तर शेतकरीही या मोर्चात सहभागी होणार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होईल. लोकप्रतिनिधींशी चर्चा करूनच हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पाटील यांनी सांगितले.

  मुंबई: मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजी छत्रपती यांनी संपूर्ण राज्यात दौरा केल्यानंतर कोल्हापूरात मूक मोर्चा काढला. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्र्यांनी चर्चा करण्याचे आमंत्रण देत सर्व मागण्या मान्य असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. कोल्हापूरनंतर आता सोलापुरात येत्या ४ जुलै रोजी उग्र मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगत सोलापूरच्या प्रत्येक तालुक्यात रास्ता रोको करण्याची घोषणा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

  मराठा समाजासोबत शेतकरीही मोर्चात सहभागी
  नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाची माहिती दिली. कोल्हापूरनंतर आता सोलापुरात हा मोर्चा निघणार आहे. केवळ मराठा समाजच नाही तर शेतकरीही या मोर्चात सहभागी होणार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होईल. लोकप्रतिनिधींशी चर्चा करूनच हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पाटील यांनी सांगितले. तसेच या मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांना भेटून पत्र देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

  परवानगी असो नसो, मोर्चा निघणारच
  या मोर्चाच्या पूर्व तयारीसाठी या आठवड्यात जिल्ह्याचा दौरा करण्यात येणार आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी सोलापुरातील लोकप्रतिनिधींसह खासदार संभाजी छत्रपती, खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे. मूक मोर्चा काढून काहीही होत नाही. त्यामुळे उग्र मोर्चा काढणार आहोत, असा टोलाही त्यांनी लगावला. मोर्चासाठी पोलिसांची परवानगी असो नसो, आमचा मोर्चा निघणारच. आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रास्तारोको करणार आहोत. महामार्ग अडवणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. आक्रमक झालो तरच महाविकास आघाडी सरकार दखल घेईल. अन्यथा दाखल घेतली जाणार नाही. मराठा समाज लढवय्या समाज असल्याने आता आक्रमक होण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.

  काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली कशी चालते?
  मराठ्यांचा विषय आला की कोरोनाचे कारण दाखवले जाते. मात्र मागील वर्षी काँग्रेसने ट्रॅक्टर रॅली काढली. ते कसे चालते? आता आमच्या जगण्यामरण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने आम्ही आंदोलन करणार आहोत, असे सांगत क्रांती मोर्चाचे लोक कुठे आहेत? ते जातिवंत मराठा आहेत का?, असा सवाल त्यांनी केला. सोलापूर जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर येत्या २५ जून रोजी नवी मुंबई येथे माथाडी समाजाची गोलमेज परिषद होणार आहे. या परिषदेला खा. संभाजीराजे यांची प्रमुख उपस्थिती असेल. या परिषदेला भाजप नेते नारायण राणे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदींना आमंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.