ममतांचे राजकारण काँग्रेसधार्जिणे नाही. पश्चिम बंगालातून त्यांनी काँग्रेस, डावे व भाजपलाही संपवले हे सत्य असले तरी काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणातून दूर ठेवून राजकारण करणे म्हणजे सध्याच्या ‘फॅसिस्ट’ राज्य प्रवृत्तीस बळ देण्यासारखेच आहे. काँग्रेसचा सुपडा साफ व्हावा असे मोदी व त्यांच्या भाजपास वाटणे एकवेळ समजू शकतो. तो त्यांच्या कार्यक्रमाचाच भाग आहे, पण मोदी व त्यांच्या प्रवृत्तीविरुद्ध लढणाऱयांनाही काँग्रेस संपावी असे वाटणे हा सगळ्यात गंभीर धोका आहे.
काँग्रेसला विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याचा दैवी अधिकार प्राप्त झालेला नाही, असे ऐतिहासिक विधान तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत किशोर करतात. दैवी अधिकार कोणालाच प्राप्त होत नाहीत. 2024 साली कुणाचे दैव, कोणाचे भाग्य फळफळेल ते सांगता येत नाही. ‘यूपीए’ नेतृत्वाचा दैवी अधिकार कोणाचा ते येणारा काळ ठरवेल. आधी पर्याय तर उभा करा! असं म्हणत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून तृणमूलच्या नेत्यांना सल्ला देण्यात आला आहे.
काय म्हटलंय सामनात?
ममता बॅनर्जी यांच्या मुंबई भेटीनंतर विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. निदान शब्दांचे हवाबाण तरी सुटत आहेत. भारतीय जनता पक्षासमोर समर्थ पर्याय उभा करायला हवा यावर एकमत आहेच, पण कोणी कोणाला बरोबर घ्यायचे किंवा वगळायचे यावर विरोधकांत अखंड खल सुरू आहे. विरोधकांतच ऐक्याचा किमान समान कार्यक्रम तयार होणार नसेल तर भाजपास समर्थ पर्याय देण्याच्या बाता कोणी करू नयेत.
आपापली राज्ये व पडक्या, मोडक्या गढय़ा सांभाळीत बसावे की एकत्र यावे यावर तरी किमान एकमत होणे गरजेचे आहे. त्या ऐक्याचे नेतृत्व कोणी करावे तो पुढचा प्रश्न. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालात एखाद्या वाघिणीप्रमाणे झुंजल्या, लढल्या व जिंकल्या. बंगालच्या भूमीवर भाजपास चारीमुंडय़ा चीत करण्याचे काम त्यांनी चोख पार पाडले. त्यांच्या संघर्षास देशाने प्रणाम केलाच आहे. ममता यांनी मुंबईत येऊन राजकीय गाठीभेटी घेतल्या.
ममतांचे राजकारण काँग्रेसधार्जिणे नाही. पश्चिम बंगालातून त्यांनी काँग्रेस, डावे व भाजपलाही संपवले हे सत्य असले तरी काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणातून दूर ठेवून राजकारण करणे म्हणजे सध्याच्या ‘फॅसिस्ट’ राज्य प्रवृत्तीस बळ देण्यासारखेच आहे. काँग्रेसचा सुपडा साफ व्हावा असे मोदी व त्यांच्या भाजपास वाटणे एकवेळ समजू शकतो. तो त्यांच्या कार्यक्रमाचाच भाग आहे, पण मोदी व त्यांच्या प्रवृत्तीविरुद्ध लढणाऱयांनाही काँग्रेस संपावी असे वाटणे हा सगळ्यात गंभीर धोका आहे.
काँग्रेस पक्षाची गेल्या दहा वर्षांतील घसरण चिंताजनक आहे याबाबत दुमत नाही. तरीही उताराला लागलेली ही गाडी पुन्हा वर चढूच द्यायची नाही व काँग्रेसची जागा आपण घ्यायची हे मनसुबे घातक आहेत. काँग्रेसचे दुर्दैव असे की, ज्यांनी आयुष्यभर काँग्रेसकडून सुख चैन सत्ता प्राप्त केली तेच लोक काँग्रेसचा गळा दाबत आहेत.
काँग्रेसला विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याचा दैवी अधिकार प्राप्त झालेला नाही, असे ऐतिहासिक विधान तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत किशोर करतात. दैवी अधिकार कोणालाच प्राप्त होत नाहीत. 2024 साली कुणाचे दैव, कोणाचे भाग्य फळफळेल ते सांगता येत नाही. भाजपचा जन्म कायम विरोधी बाकांवरच बसण्यासाठी झाला आहे, अशी टवाळकी पचवून हा पक्ष अवकाशात झेपावला आहे. आज राहुल गांधी, प्रियंका गांधींची राजकीय कुचाळकी सुरूच आहे. राहुल गांधी व प्रियंका अशा कुचाळक्यांना तोंड देत संघर्ष करीत आहेत. ‘यूपीए’ नेतृत्वाचा दैवी अधिकार कोणाचा ते येणारा काळ ठरवेल. आधी पर्याय तर उभा करा!