परळीची माती आणि पक्षाच्या साथीनेच आज मी मंत्री झालो – धनंजय मुंडे

    बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर मला सर्व स्तरावर खलनायक ठरविण्यात आले. लोकांच्या भावनिक प्रचारामुळे अनेकांनी मला शिव्या घातल्या, परंतु परळीच्या मातीतील माणसांनी मला उभारी दिली. पक्षाचे नेते खासदार शरद पवारसाहेब यांनी मला संधी दिली आणि आज मी राज्याचा मंत्री होऊ शकलो. या मातीचे व पक्षाचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही, असे प्रतिपादन धनंजय मुंडे यांनी केले.

    धनंजय मुंडे हे अत्यंत प्रतिभावान नेते आहेत, पुढील काळात परळी मतदारसंघासह राज्यभरात त्यांच्या हातून मोठे विकासकार्य होणे अपेक्षित आहे. येत्या काही वर्षात परळी मतदारसंघाचा त्यांच्या हातून बारामतीसारखा विकास होईल, त्यासाठी परळीकरांनी कायम पाठीशी राहून आपल्या धनुभाऊंना पाठबळ द्यावं असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

    जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याच्या तिसऱ्या पर्वात ही यात्रा बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात आली असता जयंत पाटील यांनी परळी मतदारसंघात बैठक घेतली, मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता या बैठकीचे मेळाव्यात रूपांतर झाले आहे असे जयंत पाटील म्हणाले.

    आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच जयंत पाटील यांनी बीड जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा उल्लेख करत बीड जिल्ह्यातील नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार भक्कमपणे उभे असल्याचे सांगितले. तसेच राज्यसरकार प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यांच्या आधारे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत करणार असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

    या कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शिवकन्या सिरसाट,  जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आमदार उषाताई दराडे,  महिला आघाडीच्या हेमाताई पिंपळे, जिल्हाध्यक्ष संगीताताई तुपसागर, प्रज्ञाताई खोसरे, रेखाताई फड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध आघाड्या व सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारिणीचे सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.