BMC शाळेतील विद्यार्थ्यांना दिले जाणार आग प्रतिबंधक उपाययोजनांचे प्रशिक्षण;  अभ्यासक्रमांतच समाविष्ट होणार विषय

मुंबई : मुंबईतील वाढत्या आगींचे प्रमाण रोखण्यासाठी मनपा शाळांतील विद्यार्थ्याना आग प्रतिबंधक उपाययोजनांचे धडे दिले जाणार आहेत.  इयत्ता ८ वी, ९ वी आणि १० वीच्या अभ्यासक्रमांत हा विषय समाविष्ट करण्याच्या हालचाली पालिकेने सुरु केल्या आहेत.

मुंबईत छोट्या- मोठ्या आगींचे सत्र कायम आहे. टोलेजंग इमारती, मॉल्स, उपहारगृहे, रेस्टॉंरट आदींंमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा बसवणे बंधनकारक केली आहे. परंतु, अशा ठिकाणी आगीची घटना घडल्यास, तेथील परिस्थितीत यंत्रणा कशी हाताळावी, याबाबत अनेकांना संपूर्ण माहिती नसते. परिणामी वित्त आणि मनुष्यहानी होते. आगी प्रतिबंधासाठी महापालिका जनजागृती अभियान राबवते. मात्र, नागरिकांच्या दुर्लक्षामुळे पालिकेचा उद्देश साध्य होत नाही.

त्यामुळे शालेय जीवनापासून आगींच्या घटनांबाबत प्रतिबंधक उपययोजनांची माहिती दिली जाणार आहे. मनपाच्या शाळांतील ८ वी, ९ वी आणि १० वी च्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमांत ‘आग प्रतिबंधक सुरक्षा आणि उपाययोजना’ हा विषय समाविष्ट करण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

आग प्रतिबंधक उपाययोजनांचा इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमांत समावेश करावा, यासाठी महापौर, शिक्षण समिती अध्यक्षा, मनपा आयुक्त, पालिका शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार करणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना या गोष्टींचे महत्व आणि प्रशिक्षण दिल्यास भविष्यात ते फायदेशीर ठरले. शिवाय, घरा शेजारी आगीची दुर्घटना घडली तर अशा ठिकाणी विद्यार्थी आपल्या ज्ञानाचा उपयोग करुन परिस्थिती नियंत्रणास आणतील.

कैलास हिवराळे, अग्निशमन दल प्रमुख अधिकारी