ऑनलाईन शिक्षणासाठी २० हजार शिक्षकांना प्रशिक्षण

मुंबई :नवीन शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा, शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन अध्ययन-अध्यापन प्रक्रिया योग्य व्हावी यासाठी मुंबई महापापलिकेच्या शिक्षण विभागाने

मुंबई : नवीन शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास  व्हावा, शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन अध्ययन-अध्यापन प्रक्रिया  योग्य व्हावी यासाठी मुंबई महापापलिकेच्या शिक्षण विभागाने आता कंबर कसली आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागाने मुंबईतील तब्बल तीन हजारपेक्षा अधिक शाळांमधील जवळपास 20 हजार शिक्षकांना सोमवारपासून ऑनलाईन प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. 

महापालिका शाळा, खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकारी यांना ऑनलाईन प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील शैक्षणिक व तांत्रिक कौशल्ये विकसित करण्यासाठी पालिकेकडून हे प्रशिक्षण घेण्यात येत आहे.यामध्ये ८ जूनला पूर्व उपनगरे, ९ जूनला पश्चिम उपनगरे व १० जूनला मुंबई शहर या विभागातील प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहेत. 

सोमवारी झालेल्या प्रशिक्षणाला ७ हजारपेक्षा अधिक शिक्षक व अधिकारी उपस्थित राहिले होते. सर्व शिक्षक व अधिकार्‍यांचे नवीन आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी समुपदेशन करणे. सर्व शिक्षकांना ऑनलाइन शिक्षण प्रभावीपणे पार पाडण्यासाठी योग्य ती तांत्रिक कौशल्ये शिकवणे.

ऍनिमेशन, प्रेझेंटेशन, व्हिडिओ निर्मिती कशी करावी. झुम, गुगल मीट, गुगल क्लास, फेसबुक, ट्विटर, टेलीग्राम, व्हॉटस अप व हँग आऊट इत्यादीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणे हे या प्रशिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रशिक्षणामध्ये सह आयुक्त (शिक्षण) आशुतोष सलिल, शिक्षणाधिकारी महेश पालकर तसेच स्टर लाईट एअर इंडिया फाउंडेशनच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी ऑनलाईन प्रशिक्षणासाठी आवश्यक विविध टुल्स व साधनांबाबत माहिती दिली. 

शैक्षणिक दृष्ट्या आव्हानात्मक बाबींवर प्रकाशझोत टाकुन योग्य कौशल्यांबाबत चर्चा करुन शिक्षकांची मानसिक व शैक्षणिक तयारी करण्यात आली.मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक, विधी समिती अध्यक्षा शितल म्हात्रे, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी उद्घाटनाच्या दिवशी ऑनलाईन उपस्थितीत प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी केले.  सूत्रसंचालन विभाग निरीक्षक किसन पावडे यांनी केले.