परिवहन मंत्री अनिल परब आज ईडी चौकशीस उपस्थित राहणार?

परिवहन मंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज, मंगळवारी चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याबाबत दुसऱ्यांदा नोटीस बजावली आहे; पण ते या चौकशीला गैरहजर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

    मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज, मंगळवारी चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याबाबत दुसऱ्यांदा नोटीस बजावली आहे; पण ते या चौकशीला गैरहजर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

    दरम्यान त्यांच्याकडे कशाबद्दल चौकशी करावयाची आहे, हे स्पष्ट न केल्याने प्रत्यक्ष हजर न राहता त्याबाबत विचारणा करण्यात येईल, असे समजते. ईडीने परब यांना शुक्रवारी दुसरे समन्स बजावले. त्यात मंगळवारी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली आहे.

    यापूर्वी २९ ऑगस्टला पहिल्यांदा दिलेल्या नोटीसमध्ये केवळ ‘इन्व्हेस्टिगेशन पार्ट’ इतकेच नमूद करून चौकशीस हजर राहावे, असे नमूद केले होते. मात्र, परब यांनी पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहणे शक्य नसल्याचे त्यांनी नमूद केले होते.

    त्यांच्याकडे १०० कोटी वसुली प्रकरण व सचिन वाझेने एनआयए कोठडीतून लिहिलेल्या पत्रात बीएमसी कंत्राटदाराकडून वसुली करण्याबाबत परब यांनी सूचना केल्याचे नमूद केले आहे. त्यानुषंगाने ही चौकशी केली जाणार असल्याचे समजते.