kranti redkar and nawab malik

नवाब मलिक(Nawab Malik) यांनी समीर वानखेडेची पत्नी क्रांती रेडकरच्या (Kranti Redkar)चॅटचा एक स्क्रीनशॉट (ScreenShot)शेअर करत तिच्यावर निशाणा साधला आहे. मात्र या स्क्रीनशॉटबद्दल क्रांतीने खुलासा केला असून याविषयी संताप व्यक्त केला आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे गेल्या अनेक आठवड्यांपासून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. अभिनेता शाहरुख खानचा पुत्र आर्यन खानला क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर मलिक यांनी समीर वानखेडेंनी ते मुस्लीम असल्याचं लपवून आरक्षणाचा लाभ घेत नोकरी मिळवल्याचा आरोप केला. त्यानंतर वेळोवेळी कधी ट्विटरवरुन तर कधी थेट पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांवर आरोप केले. आता नवाब मलिक यांनी समीर वानखेडेची पत्नी क्रांती रेडकरच्या चॅटचा एक स्क्रीनशॉट शेअर करत तिच्यावर निशाणा साधला आहे. मात्र या स्क्रीनशॉटबद्दल क्रांतीने खुलासा केला असून याविषयी संताप व्यक्त केला आहे.

    गेल्या काही आठवड्यांपासून वानखेडे कुटुंबीय वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन आपली बाजू मांडत आहेत. दरम्यानच्या काळात नवाब मलिक यांनी दाऊदशी संबंधित संपत्ती घेतल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर मलिक यांनी आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं. याच वादाच्या पार्श्वभूमीवर एका युझरने क्रांतीला मलिक आणि दाऊद कनेक्शनसंदर्भात माहिती असल्याचं सांगितलं. त्याच विषयावरील हे चॅट आहे.

    Malik-Tweet

    मलिक यांनी शेअर केलेला संवाद हा ट्विटरवरील आहे. यामध्ये एका युजरने क्रांती रेडकरला माझ्याकडे नवाब मलिक यांचे काही फोटो असल्याचं सांगितलं आहे. “क्रांती रेडकर मॅडम माझ्याकडे नवाब मलिक आणि दाऊद यांचा संबंध असल्याचे पुरावे आहेत, अधिक माहितीसाठी थेट मेसेज करा,” असं या युझरने म्हटलं आहे. त्यावर रात्री पावणे अकराच्या सुमारास क्रांती रेडकरने, “तुमच्याकडे काय पुरावे आहेत?”, असा रिप्लाय केलाय. “माझ्याकडे नवाब मलिक आणि दाऊद यांचा फोटो आहे,” असं या युझरने म्हटलंय. त्यावर पुढच्या मिनिटालाच क्रांतीने, “कृपया तो फोटो पाठव. याबदल्यात तुला योग्य तो मोबदला मिळेल,” असा रिप्लाय केलाय. या संवादाचा स्क्रीनशॉट मलिक यांनी, “अरे देवा…” अशा कॅप्शनसहीत शेअर केला.

    मात्र या ट्विटनंतर काही तासांनी क्रांतीने ट्विट करत हा सारा प्रकार म्हणजे बनाव असल्याचं स्पष्ट केलं आहे. नवाब मलिक यांनी जो फोटो शेअर केलाय तो एका उपहासात्मक मिम्स आणि फोटो तयार करणाऱ्या अकाऊंटवरील असून तो एडीटेड कंटेट असल्याचं या अकाऊंटची मालकी असणाऱ्या व्यक्तीनेच म्हटलं आहे. क्रांतीने हे स्क्रीनशॉर्ट शेअर करत, “हा प्रकार एवढ्या खालच्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं,” असं म्हटलंय.