अल्पवयीन मुलीला पळवणाऱ्या दोघांना अटक ; व्ही. बी. नगर पोलिसांकडून २४ तासांत गुन्ह्याची उकल

२४ तासांत गुन्ह्याची उकल

    मुंबई : १४ वर्षीय मुलींला पळवणाऱ्या दोन जणांना बुधवारी अटक करण्यात आली. सदर कारवाई विनोबा भावे नगर पोलिसांनी टिटवाळा येथे करून अवघ्या २४ तासात मुलीची सुखरूप सुटका केली.

    सुलताना लियाकत खान ही कुर्ला पश्चिम परिसरातील माकडवाला कंपाउंड, पाईप लाईन रोड येथे राहते. १४ वर्षीय बेपत्ता झाल्याची तक्रार तिने विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तात्काळ मुलीचा शोध सुरू केला. बेपत्ता मुलगी दुपारच्या सुमारस शेजारी राहणा नशिबूलसोबत बोलत असल्याचे सुलतान हिच्या लहान मुलीने पाहिले होते. त्यानुसार पोलिसांनी नशिबूलचा पती जावेद खान याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. पत्नी नशिबूल हिचा मित्र शोहेब याच्यासोबत बेपत्ता मुलगी नेहमी बोलत असल्याचे जावेद याने पोलिसांना सांगितले. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी शोहेबचा शोध सुरू केला. तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले असता शोहब हा टिटवाळा परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांचे पथक तात्काळ टिटवाळ््यात दाखल झाले. पोलिसांनी सापळा लावून मुलीला पळवणाऱ्या छब्बीर जावेद अन्सारी (२१) व शोहेब सईद खान (२०) यांच्या मुसक्या आवळून १४ वर्षीय मुलीची सुटका करण्यात आली.

    सदर कारवाई परिमंडळ ५ चे उपायुक्त प्रणय अशोक, कुर्ला विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश जाधव, विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याचे राजेश पवार, तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र सपकाळे, हवालदार प्रकाश राजे, पोलीस नाईक अनंत दळवी, पोलीस अंमलदार निवेदिता सोनवणे, पोलीस नाईक विनोद पवार आदी पोलीस पथकाने केली.