उमेश कोल्हे हत्या प्रकरण : ११ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल, एनआयएकडून भादंवि आणि युएपीएतर्गंत गुन्ह्यांची नोंद

नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमावर संदेश प्रसारीत केल्यामुळे अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. २१ जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश कोल्हे हे दुकान बंद करून मोटर सायकलने घरी जात असताना रात्री १०.३० च्या सुमारास चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली.

    मुंबई – अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हेची हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी ११ आरोपींविरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सर्व आरोपींवर भारतीय दंड संहिता आणि बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यानुसार(युएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमावर संदेश प्रसारीत केल्यामुळे अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. २१ जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश कोल्हे हे दुकान बंद करून मोटर सायकलने घरी जात असताना रात्री १०.३० च्या सुमारास चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आल्यानंतर ११ जणांना अटक करण्यात आली असून दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेने सप्टेंबर महिन्यात या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढ मागितली होती.