विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार

पुढच्या आठवड्यात होणाऱ्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर (Wet Drought In Maharashtra)करण्याबाबत चर्चा होईल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी माध्यमांना दिली.

  मुंबई : गुलाब चक्रीवादळातच्या(Cyclone Gulab) प्रभावाने राज्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीत(Loss By Heavy Rain) सुमारे ७ ते ८ हजार कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर (Wet Drought In Maharashtra)करण्याबाबत चर्चा होईल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी माध्यमांना दिली.

  १७ लाख हेक्टर शेतपिकाचे नुकसान
  वडेट्टीवार म्हणाले, मागच्या दोन दिवसात मराठवाड्यातील १० पैकी ७ जिल्ह्यांत १७० ते १८० मिमी पाऊस पडला आहे. तसेच यंदा पावसाळ्यात तब्बल ४३६ नागरिकांचा बळी गेला. त्यात १९६ नागरिकांचा वीज पडून मृत्यू झाला. सप्टेंबर महिन्यात ७१ लोकांचा जीव गेला असून २६ नागरिक जखमी झाले आहेत. तर ९६ मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात तब्बल १७ लाख हेक्टर शेतपिकाचे नुकसान झाले आहे. पैकी ८१ टक्के नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. संपूर्ण पंचनामे झाले तर नुकसानीच्या क्षेत्राचा आकडा २२ लाख हेक्टरवर जाईल. तौक्ते चक्रीवादळासाठी २०३ कोटीचा केंद्राला प्रस्ताव पाठवला होता. जुलै मधल्या पूराच्या नुकसान भरपाईसाठी १ हजार ६७९ कोटीचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र केंद्राची काहीच मदत आली नाही, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

  केंद्राची फक्त २६८ कोटीची मदत
  २०२० च्या निसर्ग चक्रीवादळाच्या भरपाईपोटी केंद्राकडे १ हजार ६५ कोटीची मदत मागितली होती. मात्र केंद्राने फक्त २६८ कोटीची मदत दिली. मागच्या वर्षी महाविकास आघाडीच्या सरकारने १० हजार ५०० कोटीचे पॅकेज जाहीर केले होते. पैकी ७ हजार ५०० कोटीची मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

  मुख्यमंत्री पाहणी दौरा करतील
  राज्यातील कोणते जिल्हे गुलाब चक्रीवादळाच्या अतिवृष्टीने प्रभावीत झाले आहेत, याची माहिती महसूल यंत्रणेकडून गोळा केली जात आहे. दोन दिवसात पाऊस थांबल्यावर पालकमंत्री प्रभावीत जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्रीसुद्धा पाहणी दौरा करतील, असे सांगून नुकसानग्रस्त शेतपिकाचे सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.