‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’ या मागणीसाठी वारकरी शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

महाराष्ट्राची शेकडो वर्षांची पायी वारीची परंपरा जी निजामांच्या, मुघलांच्या आणि इंग्रजांच्या काळातही खंडित झाली नाही तिला सलग दुसऱ्या वर्षी खंडित करण्याचे पाप आघाडी सरकारने करू नये. सरकारने निर्बंधांसह ५० वारकऱ्यांच्या पायी वारीला परवानगी द्यावी. आमच्या ज्ञानोबा-तुकोबांसह ५० वारकऱ्यांना  सुरक्षा देणे राज्य सरकारला झेपत नसेल तर त्यांनी केंद्राकडून सुरक्षा मिळवत ही पायी वारी करावी.

    मुंबई: राज्य सरकारने यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० मानाच्या दिंड्या बसने नेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संस्थानांनी नाईलाजाने स्विकारला असला तरी तो वारकरी संप्रदायाला मान्य नाही. अनेक वारकरी संघटनांनी पायीच वारी करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाने  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.

    भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचा पुढाकार
    या शिष्टमंडळात भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी चे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्यासह वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती ,पंढरपूर चे सदस्य ह.भ.प.प्रकाश महाराज जवंजाळ, संत तुकारामांचे वंशज आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर चे सदस्य ह.भ.प.शिवाजी महाराज मोरे, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वरचे माजी अध्यक्ष ह.भ.प संजयनाना महाराज धोंडगे, प्रख्यात किर्तनकार आणि विश्व हिंदु परिषदेचे ह.भ.प.एकनाथ महाराज सदगीर आदी सहभागी होते.

    केंद्राकडून सुरक्षा मिळवत ही पायी वारी करावी
    “महाराष्ट्राची शेकडो वर्षांची पायी वारीची परंपरा जी निजामांच्या, मुघलांच्या आणि इंग्रजांच्या काळातही खंडित झाली नाही तिला सलग दुसऱ्या वर्षी खंडित करण्याचे पाप आघाडी सरकारने करू नये. सरकारने निर्बंधांसह ५० वारकऱ्यांच्या पायी वारीला परवानगी द्यावी. आमच्या ज्ञानोबा-तुकोबांसह ५० वारकऱ्यांना  सुरक्षा देणे राज्य सरकारला झेपत नसेल तर त्यांनी केंद्राकडून सुरक्षा मिळवत ही पायी वारी करावी कारण असेही हे सरकार उठसूठ केंद्राकडेच सर्व मागत आहे. धर्मरक्षक राज्यपाल वारकऱ्यांच्या भावना समजून घेऊन पायी वारीची परंपरा जोपासण्यासाठी नक्की प्रयत्न करतील अशी आम्हाला आशा आहे.” आचार्य तुषार भोसले.