हजारोंचा जमाव गोळा करून सोमय्या यांच्या जीवाला घातपात करण्याचा डाव तर नव्हता ना ? प्रविण दरेकर यांची चौकशीची मागणी

  मुंबई : कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीसमध्ये नमुद केले की, किरीट सोमय्या यांच्या जीवाचा धोका आहे, मग कोल्हापूरमध्ये जमाव निर्माण करून सोमय्या यांच्या जीवाला काही घातपात करण्याचा तर कट नव्हता ना… असा संशय निर्माण होत असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

  मुख्यमंत्री-गृहमंत्री राम भरोसे

  प्रविण दरेकर म्हणाले, गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी असेही म्हंटले आहे की, अशा प्रकारच्या कारवाईबद्दल मुख्यमंत्र्यांना कळवले जाते. गृहमंत्री सांगतात की, जिल्हाधिकारी स्तरावरची ही कारवाई आहे,  त्यामुळे आम्हांला कळवले नव्हते. तर शिवसेना खासदार संजय राऊत एका बाजूला बोलतात की, मुख्यमंत्री कार्यालयाला या संदर्भात काही माहिती नव्हती. मुख्यमंत्र्यांशी या सर्वांशी काही संबंध नाही,  गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार कारवाई आहे. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामुळे या दोन्ही पक्षांत किती आलबेल आहे हे उघड  झाल्याचे त्यांनी सांगितले.

  भारतीय जनता पक्षाची प्रकरणे सापडणार नाहीत

  दरेकर म्हणाले, चंद्रकांतदादा पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रात भाजपची कशी घोडदौड चालू आहे हे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. त्यांनी हसन मुश्रीफ यांना आव्हान दिले आहे. सर्व बाबतीत कायदेशीर लढाई लढायला आम्ही पण तयार आहे. कर नाही तर डर कशाला. भारतीय जनता पार्टीने त्यांची प्रकरणे काढली म्हणून आता आमच्या पक्षांच्या नेत्याचे खोदकाम सुरू आहे परंतु त्यांनी हे लक्षात ठेवावे की किती खोदकाम केले तरी भारतीय जनता पक्षाची प्रकरणे सापडणार नाहीत, कर नसेल तर डर असायचे कारण नाही. त्यामुळे भाजप अशा प्रकारच्या धमक्यांना भीक घालत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  कोल्हापुरात नेमके काय आहे

  खासदार भावना गवळी यांच्या विषयीच्या प्रकरणा विषयी सोमय्या वाशिमला गेले होते. अनिल परब यांच्या संदर्भातही ते रत्नागिरी येथे गेले होते. दोन्ही ठिकाणी सुरळीत जाऊन आले मग कोल्हापुरात नेमके काय आहे की मुश्रीफ यांना हजारोंचा समुदाय रस्त्यावर उतरवावा लागला. तसेच जिल्हाधिका-यांनी काढलेल्या आदेशा मध्ये सोमय्या यांच्या जीविताला धोका असल्याचे का  नमूद केले आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला.